Chala Hawa Yeu Dya Show : ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोने तब्बल १० वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मात्र, अलीकडच्या काही वर्षात या शोचा टीआरपी फार कमी झाला होता. २०१४ मध्ये ‘लय भारी’ चित्रपटाच्या निमित्ताने या शोची सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला या शोला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला. पण, हळुहळू ‘चला हवा येऊ द्या’ची लोकप्रियता ओसरली.

‘झी मराठी’ वाहिनीने हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय यावर्षी घेतला. ‘चला हवा येऊ द्या’ ( Chala Hawa Yeu Dya ) कार्यक्रमाचा पहिला भाग १८ ऑगस्ट २०१४ रोजी प्रदर्शित झाला होता. तर, शेवटचा भाग १७ मार्च २०२४ रोजी प्रसारित करण्यात आला. डॉ. निलेश साबळे, सागर कारंडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, स्नेहल शिदम असे अनेक कलाकार या शोचा अविभाज्य भाग होते. ‘चला हवा येऊ द्या’ शोच्या कालांतराने कमी झालेल्या लोकप्रियतेबद्दल नुकतंच एका मुलाखतीत भाऊ कदम यांनी आपलं मत मांडलं आहे.

‘चला हवा येऊ द्या’बद्दल भाऊ कदम काय म्हणाले?

भाऊ कदम यांनी नुकतीच ‘रेडिओ सिटी मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांना ‘चला हवा येऊ द्या’ या शोला सुरुवातीला खूप यश मिळालं. पण, कालांतराने या शोचा टीआरपी कमी झाल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्या गोष्टींचा आयुष्यावर काही परिणाम झाला का? असा प्रश्न विचारण्यात आला. याबद्दल सांगताना भाऊ कदम म्हणाले, “आयुष्यावर परिणाम असा झाला नाही. पण, त्यापलीकडे मी एक विचार केला. अशा गोष्टी घडतात तेव्हा मी सर्व अंदाज घेतो. याचा थोडा वेगळ्या पद्धतीने विचार केला.”

“‘चला हवा येऊ द्या’ची ( Chala Hawa Yeu Dya ) स्क्रिप्ट एवढी वर्षे एकच माणूस लिहित आलाय. त्याचबरोबर दुसऱ्या एका चॅनेलवर सुद्धा कॉमेडी शो सुरू होता. पण, तिथे लेखक वेगवेगळे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे व्हेरिएशन होते पण, आमच्याकडे एकच माणूस लिहित असल्यामुळे व्हेरिएशन किती येणार… आता आपण केलेलं सगळंच हिट होतं असं नाहीये. कोणतीच प्रक्रिया अशी नसते. आपण केलेली प्रत्येक गोष्ट जशी हिट होत नाही अगदी तसंच आपलं प्रत्येक स्किट वाजेलच असं नाहीये. कुठेतरी अपयश ही यशाची पायरी असते. त्यामुळे खाली आल्यावरच आपण पुन्हा वर जातो, यातही एक वेगळी मजा येते.” असं उत्तर भाऊ कदम यांनी दिलं.

दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ शो ( Chala Hawa Yeu Dya ) संपल्यावर ‘कलर्स मराठी’वरच्या ‘हसताय ना हसायलाच पाहिजे!’ या शोमध्ये भाऊ कदम झळकले होते.

Story img Loader