छोट्या पडद्यावरील मालिका घराघरांत पाहिल्या जातात. लोकप्रिय मालिकांमध्ये अनेकदा कथानकानुसार नव्या कलाकारांच्या एन्ट्री केल्या जातात. ‘स्टार प्रवाह’च्या अशाच एका लोकप्रिय मालिकेत एका बहुचर्चित अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. हे अभिनेते नेमके कोण आहेत पाहूयात…
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सायंकाळी ७:३० वाजता रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका प्रसारित केली जाते. या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या मालिकेत रेश्मा ‘जानकी’ची तर, सुमीत ‘हृषिकेश’ ही भूमिका साकारत आहे.
गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत जानकी आणि हृषिकेश हे दोघं मिळून नानांचा ( हृषिकेशचे वडील ) शोध घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. हृषिकेश संपूर्ण मुळशी गाव शोधून काढतो तरीही, त्याच्या हाती काहीच लागत नाही. ऐश्वर्याने मोठा प्लॅन बनवून नानांना किडनॅप केलेलं असतं. याचदरम्यान, एक पोलीस अधिकारी हृषिकेशच्या मागावर राहतो आणि त्याला चौकशीसाठी कधीही ताब्यात घेतलं जाईल असं सांगण्यात येतं. हृषिकेशच्या विरोधात केस लढण्यासाठी सयाजीरावांनी मोठ्या नावाजलेल्या वकिलांना बोलावलेलं असतं.
सयाजीरावांचे वकील आजवर एकही केस हरलेले नसतात. त्यांचं नाव आशुतोष निंबाळकर असतं. मुंबईत राहणारे निंबाळकर फक्त सयाजीरावांच्या शब्दाखातर मुळशीला यायला तयार होतात. यात वकिलांची भूमिका अभिनेते आनंद काळे साकारणार आहेत. टेलिव्हिजन गाजवणाऱ्या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेत त्यांनी अशोक देशमुख ही भूमिका साकारली होती. याशिवाय श्रेयस तळपदेच्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत त्यांनी विश्वजीत चौधरी हे पात्र साकारलं होतं.
टेलिव्हिजनचे हे लोकप्रिय अभिनेते आता ‘निंबाळकर वकील’ म्हणून ‘स्टार प्रवाह’च्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत एन्ट्री घेणार आहेत. त्यांची एन्ट्री झाल्यावर जानकी आणि हृषिकेशच्या आयुष्यात आणखी संकटं येणार आहेत. त्यामुळे या वकिलांचा सामना जानकी-हृषिकेश कसा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका रोज सायंकाळी साडेसात वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित केली जाते. यामध्ये रेश्मा शिंदे, सुमीत पुसावळे यांच्यासह प्रतीक्षा मुणगेकर, आशुतोष पत्की, ऋतुजा कुलकर्णी, आरोही सांबरे, सविता प्रभुणे, भक्ती देसाई, उदय नेने, नयना आपटे, प्रमोद पवार असे अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.