Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा सध्या नववा आठवडा सुरू आहे. यंदाचं ‘बिग बॉस मराठी’ हे १०० दिवसांचं नसून फक्त ७० दिवसांचं आहे. त्यामुळे हे पर्व संपण्यासाठी अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर या आठ सदस्यांमधून एक ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरणार आहे. त्यामुळे सध्या ‘बिग बॉस’च्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. अशातच १०० दिवसांऐवजी ७० दिवस ‘बिग बॉस मराठी’ का केलं? या प्रश्नावर घनःश्याम दरवडे उर्फ छोट्या पुढारीने मोठं वक्तव्य केलं आहे.

नुकतीच घनःश्याम दरवडेने ‘मुंबई तक’ या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी घनःश्यामला विचारलं गेलं की, “१०० दिवसांचं पर्व ७० दिवसांवर का आणलं? तुझ्यासारखे, आर्यासारखे स्पर्धक घराबाहेर पडल्यामुळे टीआरपी मिळत नाहीये का? अशी काही कारण आहेत का?” त्यावर छोटा पुढारी म्हणाला, “जेव्हा आमचा पहिल्यांदा करार झाला होता तेव्हा विषय झालेला की १०० दिवसांचा शो आहे. आज मला आनंद होतोय मी सहा आठवडे खेळत होतो. तेव्हा जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे कायम उभी राहिली. आज मला त्याचं विशेष कौतुक वाटतं.”

हेही वाचा – Video: अभिजीत आणि निक्कीची ‘बिग बॉस’ने घेतली फिरकी, जेवण भरवण्याची दिली परवानगी अन् मग…

पुढे घनःश्याम दरवडे म्हणाला की, जेव्हा मी बाहेर आलो आणि आर्या जाधव बाहेर आली निर्मात्यांना ‘बिग बॉस’ ७० दिवसांवर आणायला लागला. काही कारण असतील. पण आम्ही घरात असताना टीआरपी सर्वोच्च होता. आमच्या एक-एक वाक्यावर रील आणि गाणी बनतं होती. त्यामुळे मला असं वाटतंय जे माणसं शोला टीआरपी देत होते, तेच घराबाहेर आहेत. त्यामुळे शोला टीआरपी कोण देईल?

“घराबाहेर आल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेचा आला फोन अन्…”

“मी घराबाहेर आल्यानंतर वैभव चव्हाण आला, अरबाज पटेल आला, आर्या जाधव आली. आम्ही बाहेर आल्यानंतर शोची साखळी बिघडली. त्यानुसार त्यांना शो ७० दिवसांचा करावा लागला. कारण ते म्हणतायत, टीआरपी खूप आहे. पण जेव्हा आम्ही होतो तेव्हा प्रत्येक वयोगटातील लहान-लहान ४ वर्षांची पोरं मराठी भाषा, कॅरेक्टरसहित माहित होती. छोटा पुढारी, निक्की तांबोळी, अभिजीत दादा असे सगळेजण हे माहित होते. मी घराबाहेर आल्यानंतर बऱ्याच महाराष्ट्रातील जनतेचा फोन आला. मी खोटं बोलणारा माणूस नाहीये. घनःश्याम आम्ही आजपासून शप्पथ घेतोय बिग बॉस शो पाहणार नाही. मग मी त्यांचा समज काढण्याचा प्रयत्न केला. मी जरी बाहेर आलो तरी बाकीच्या खेळाडूंवर प्रेम करा. पण कदाचित फोकस कमी केला असेल, शो कमी पडला असेल. त्यामुळे त्यांना ७० दिवसांचा शो करावा लागला. टीआरपी पण ढासळालाच ना,” असं घनःश्याम दरवडे म्हणाला.

हेही वाचा – Video: …म्हणून धनंजयने हात जोडून निक्कीची मागितली माफी; म्हणाला, “मोठा भाऊ समजून…”, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

दरम्यान, घनःश्याम दरवडे ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या आठवड्यात घराबाहेर झाला. यावेळी त्याने घराबाहेर होताना म्युच्युअल फंडचा कॉइन सूरज चव्हाला दिला होता.