CID 2 New Promo : सोनी टीव्हीवरील ‘सीआयडी’ या शोने गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन केले. या शोमध्ये अभिनेते शिवाजी साटम यांनी एसीपी प्रद्युम्न हे पात्र साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. १९९८ पासून सुरू झालेला हा टीव्ही शो २०१८ पर्यंत म्हणजे तब्बल २० वर्षे सुरू होता. हा शो संपल्यानंतर प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आता “कुछ तो गडबड है…” या डायलॉगने रसिक प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करण्यासाठी सीआयडी पुन्हा एकदा सुरू होत आहे.
ऑक्टोबर २०२४ मध्ये हा शो पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. अशात आता या शोचा नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे. प्रोमोमध्ये पुन्हा एकदा हत्येचा थरार आणि त्याचा उलगडा करण्यासाठी सीआयडीची संपूर्ण टीम काम करताना दिसतेय. प्रोमोमध्ये असलेल्या माहितीनुसार, सीआयडीचे नवीन पर्व २१ डिसेंबर २०२४ पासून शनिवारी आणि रविवारी रात्री १० वाजता सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे.
हेही वाचा : ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूने केली नव्या चित्रपटाची घोषणा! मुहूर्त पडला पार, सेटवरचे फोटो केले शेअर
प्रोमोमध्ये सुरुवातीला प्रवाशांनी भरलेली एक मेट्रो ट्रेन दिसतेय. या ट्रेनमध्ये गर्दी असूनही एका महिलेची हत्या केली जाते. हत्या झाल्याने तेथे एसीपी प्रद्युम्न पोहचतात. त्यांच्यासह डॉक्टर साळुंखेसुद्धा घटनास्थळी पोहचतात. पुढे एसीपी प्रद्युम्न मृत मुलीला पाहून म्हणतात, “डॉक्टर साळुंखे काय सांगत आहे हा मृतदेह.” त्यावर डॉक्टर साळुंखे म्हणतात, “मृतदेह तर शांत आहे, मात्र यावर असलेले पुरावे एका मोठ्या षडयंत्राकडे इशारा करत आहेत.”
त्यावर पुढे एक मोठा स्फोट होताना दिसतो आणि एसीपी प्रद्युम्न यांचा गाजलेला “कुछ तो गडबड है…” हा डायलॉग ऐकू येतो. त्यानंतर दया त्याच्या नेहमीच्या खास अंदाजात दरवाजा तोडून एन्ट्री घेतो, तर दुसरीकडे अभिजीत कैद्यांच्या कपड्यांमध्ये असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.
हेही वाचा : Video: गर्दीत चाहत्याने आणलेली विठ्ठलाची मूर्ती पाहिली अन्…; अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेचं होतंय कौतुक
प्रोमो समोर आल्यापासून चाहत्यांमध्ये आता सीआयडीचा पहिला एपिसोड पाहण्याची उत्सुकता लागली आहे. तसेच शो पुन्हा एकदा सुरू होत असल्याने चाहत्यांनी कमेंटमध्ये आनंद व्यक्त केला आहे. “माझा सर्वात आवडता शो पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहे”, अशी कमेंट एकाने केली आहे, तर दुसऱ्या एका युजरने “ऑल टाइम फेव्हरेट शो”, असं म्हटलं आहे; तर आणखी एकाने “धन्यवाद सोनी टीव्ही, आवडता टीव्ही शो पुन्हा एकदा पाहता येणे माझ्यासाठी फार आनंदाचा क्षण आहे”, अशी कमेंट करत सोनी टीव्हीचे आभार मानले आहेत.