गेल्या काही दिवसांपासून CID हा शो सर्वत्र चर्चेत आला आहे. १९९८ मध्ये ही मालिका सुरू झाली होती. यानंतर २० वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. २०१८ मध्ये ही मालिका बंद करण्यात आली होती. पण, चाहत्यांच्या मागणीमुळे या मालिकेचा नवा सीझन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, आता ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम ‘सीआयडी २’ मधून बाहेर पडणार आहेत. या मालिकेत बॉम्बस्फोटात एसीपी प्रद्युम्न यांचा जीव जाणार असा ट्रॅक पाहायला मिळणार आहे.

एसीपी प्रद्युम्न CID मधून एक्झिट घेणार असल्याच्या वृत्तावर निर्मात्यांनी अधिकृत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. ही पोस्ट पाहिल्यावर चाहते देखील निराश झाले आहेत. दरम्यान, आता सीआयडीमध्ये एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारणारे अभिनेते शिवाजी साटम यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

बॉम्बे टाइम्सशी बोलताना, एसीपी प्रद्युम्न म्हणजेच अभिनेता शिवाजी साटम म्हणाले, “मला याबद्दल कोणतीही माहिती नाही. मी काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. शोमध्ये पुढे काय होणार आहे हे फक्त निर्मात्यांना माहिती आहे. मी माझ्या संदर्भातील सर्व गोष्टी योग्यरित्या स्वीकारण्यास शिकलो आहे. जरी माझी भूमिका इथेच संपली, तरी मी सगळं काही मान्य करेन. मात्र, माझी भूमिका संपतेय की नाही हे मला सांगण्यात आलेलं नाही. सध्या मी शोचं शूटिंग करत नाहीये.”

अभिनेते पुढे म्हणाले, “मी आता मे महिन्यात सुट्टीवर जाण्याचा विचार करत आहे कारण माझा मुलगा, जो परदेशात राहतो, तो भारतात येत आहे. मला गेली २२ वर्षे एसीपी प्रद्युम्न ही भूमिका करायला मिळाली याचा खूप आनंद आहे. हा एक उत्तम प्रवास होता. शोने मला खूप काही दिलं आहे. सध्या मी ब्रेक घेत आहे आणि माझ्या वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेणार आहे. मी एवढी वर्षे कठोर परिश्रम केलेत आणि प्रत्येकाला ब्रेक मिळायला हवा. आता माझा ट्रॅक पुन्हा सुरू होईल की नाही हे निर्मात्यांनाच माहिती आहे.”

दरम्यान, एसीपी प्रद्युम्नच्या भूमिकेने गेली अनेक वर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवलं आहे. सीआयडी हा कार्यक्रम १९९८ पासून सोनी टीव्हीवर प्रसारित होतो. छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून या शोकडे पाहिलं जातं. आता शोमध्ये शिवाजी साटम यांची जागा अभिनेता पार्थ समथान घेणार आहे.