‘सीआयडी’ फेम लोकप्रिय अभिनेत्री वैष्णवी धनराज हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती मदतीची मागणी करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमांच्या अनेक खुणा दिसत आहेत. कुटुबियांनी मारहाण केल्याचं वैष्णवीने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. तिने ‘सीआयडी’, ‘तेरे इश्क में घायल’ आणि ‘बेपनाह’ सारख्या शोमध्ये काम केलं आहे.
हिमांशू शुक्ला नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून वैष्णवी धनराजने व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलंय की ‘सीआयडी’ फेम अभिनेत्री मुंबईत मदत मागत आहे. सध्या ती मुंबईतील काशिमीरा पोलीस ठाण्यात आहे. हिमांशू नावाच्या अकाउंटवर वैष्णवीबद्दल अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. वैष्णवीच्या कुटुंबियांनी तिचा फोनही घेऊन घेतला आहे, त्यामुळे या अकाउंटवरून मदत मागत असल्याचं तिने सांगितलं.
“१० मिनिटांसाठी त्याचं ह्रदय बंद पडलं होतं”, श्रेयस तळपदेच्या प्रकृतीविषयी बॉबी देओलची माहिती
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वैष्णवीने तिच्याबरोबर झालेल्या मारहाणीबद्दल सांगितलं आणि सर्वांना मदत करण्याची विनंती केली. वैष्णवीने तिच्या चेहऱ्यावर, ओठांवर आणि हातावर जखमेच्या खुणा दाखवल्या आहेत. हा व्हिडीओ पोलीस ठाण्यातून शूट केल्याचंही तिने सांगितलं. अभिनेत्रीच्या पोस्टवर मुंबई पोलिसांनीही प्रतिक्रिया दिली आणि तिचा नंबर मागितला, जेणेकरून ते या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करू शकतील.
वैष्णवी धनराजने २०१२ मध्ये नितीन शेरावतशी लग्न केलं होतं. मात्र, आता त्यांचा घटस्फोट झाला आहे. ‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या घटस्फोटाबद्दल भाष्य केलं होतं. तिने सांगितलं होतं की ती खूप घाबरली होती आणि तिला वाटत होतं की तो (तिचा पती) तिला मारेल. त्यामुळे ती घरातून पळून गेली. तिच्या पतीने तिला एवढी मारहाण केली होती की तिच्या पायातून रक्तस्त्राव होत होता. यानंतर ती घाबरली आणि घरातून पळून गेली. मग तिने घटस्फोट घेतला होता.