टीव्हीवरील प्रसिद्ध क्राईम शो ‘सीआयडी’ने जवळपास २१ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. या शोमधील पात्रांनी चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. या शोच्या माध्यमातून अनेक कलाकार घरोघरी ओळखले जाऊ लागले. या कलाकारांपैकीच एक म्हणजे अभिनेता विवेक मशरू होय. तो जवळपास चार वर्षे या शोमध्ये दिसला होता. या शोमध्ये तो इन्स्पेक्टर विवेकची भूमिका साकारत होता. पण विवेक आता कुठे आहे आणि काय करतोय? याबद्दल जाणून घेऊयात.
हेही वाचा – कोकणातील गावी पोहोचला भाऊ कदम, कौलारू घरातील लाकडी फळीवर लिहिलेली ‘ती’ दोन वाक्ये चर्चेत
विवेक अचानक चर्चेत येण्याचं कारण म्हणजे एका ट्विटर युजरने विवेक त्याच्या भावाच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक असल्याची माहिती दिली. मोनिका शर्मा नावाच्या युजरने हे ट्वीट केलं आणि ते खूप व्हायरल झालं. त्यानंतर विवेकच्या नवीन कामाबद्दल माहिती चाहत्यांना मिळाली.
दरम्यान, विवेकने अभिनयक्षेत्र सोडलं असून तो आता बंगळुरूच्या सीएमआर विद्यापीठात प्राध्यापक आहे आणि त्याचा लूकही पूर्णपणे बदलला आहे. त्याच्या लिंक्डीन प्रोफाईलवरील माहितीनुसार तो डिपार्टमेंट ऑफ कॉमन कोअर करिकुलर डिपार्टमेंटचा डायरेक्टर आहे. यापूर्वी त्याने इंडस व्हॅली स्कूलचा मार्केटिंग डायरेक्टर म्हणूनही काम पाहिलं आहे.
ट्विटरवर चाहत्यांच्या प्रेमाने भारावलेल्या विवेक मशरूने व्हायरल ट्वीट रिट्विट करून लिहिलं, “मी जे काही थोडसं काम केलंय, त्याबद्दल तुमचं प्रेम आणि कौतुकाबद्दल धन्यवाद. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे त्याचे मनापासून कौतुक आहे. मी खूप कृतज्ञ आहे. तुम्हाला सर्वांना खूप खूप प्रेम.”
अभिनयानंतर विवेकने टेक्सास येथील ऑस्टिनमधील ग्रेट लेक्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये डेटा सायन्स आणि बिझनेस अॅनालिटिक्समध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्याने विविध शैक्षणिक संस्थांमध्ये स्ट्रॅटेजिस्ट आणि प्राध्यापक म्हणून करिअर काम केलं. अभिनयाबद्दल बोलायचं झाल्यास त्याने ‘सीआयडी’शिवाय ‘अक्कड बक्कड बंबे बो’मध्येही काम केलं होतं.