टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय आणि दीर्घकाळ चाललेली मालिका ‘सीआयडी’ला ओळखले जाते. सीआयडी या मालिकेचे निर्माते प्रदीप उप्पूर यांचे निधन झाले आहे. सीआयडी मालिकेतील एसीपी प्रद्युम्न फेम अभिनेते शिवाजी साटम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. प्रदीप उप्पूर यांच्या निधनानंतर त्यांनी भावूक पोस्ट शेअर करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सीआयडी मालिकेचे निर्माते प्रदीप उप्पूर गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने त्रस्त होते. सिंगापूरमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. अभिनेते शिवाजी साटम यांनी याबाबत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. शिवाजी साटम यांनी प्रदीप यांचा एक फोटो पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
आणखी वाचा : CID मालिकेतील अभिनेत्याच्या दुचाकीचा अपघात, शूटींगसाठी जात असताना घडली घटना
“प्रदीप उप्पर, सीआयडीचे आधारस्तंभ आणि निर्माते… नेहमी हसतमुख असणारा प्रिय मित्र, प्रामाणिक आणि स्पष्टवक्ता… पण मनाने खूप उदार. तुझ्या जाण्याने माझ्या आयुष्यातील एक मोठा अध्याय संपुष्टात आला आहे. मित्रा माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझी खूप आठवण येईल”, अशी भावूक पोस्ट शिवाजी साटम यांनी केली आहे.
दरम्यान प्रदीप उप्पर यांचा ‘नेल पॉलिश’ चित्रपट शेवटची निर्मिती होता. हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी OTT प्लॅटफॉर्म जी ५ वर प्रदर्शित झाला होता. प्रदीप हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव होते. त्यांनी टीव्हीवर अनेक हटके प्रोजेक्ट्सची निर्मिती केली होती. आहट, सीआयडी, सुपरकॉप्स व्हर्सेस सुपरव्हिलेन्स, सतरंगी ससुराल या मालिकांचीही निर्मिती केली होती. त्यांनी काही चित्रपटांचीही निर्मिती केली होती.
प्रदीप उप्पर यांची निर्मिती असलेल्या आणि सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या सीआयडी मालिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ही मालिका आजही तितकीच लोकप्रिय आहे. या मालिकेच्या चाहत्यांनाही प्रदीप यांच्या अचानक जाण्याने दु:ख झाले आहे.