मराठी कलाविश्वातील लाडकी जोडी हार्दिक जोशी व अक्षया देवधर २ डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. पुण्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नसमारंभात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
राणादा-पाठकबाईंना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षया-हार्दिकच्या लग्नाचे मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रण होते. परंतु, त्यांना विवाहसोहळ्याला उपस्थित राहणे शक्य नसल्याने त्यांनी फोनवरच हार्दिक-अक्षयाला शुभेच्छा दिल्या. रिसेप्शन सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे दोघांनाही त्यांच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा>> महापरिनिर्वाण दिनी गौरव मोरेची खास पोस्ट, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो शेअर करत म्हणाला…
हेही वाचा>> ‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेता सोशल मीडियावर मागतोय नोकरी; बायोडेटा शेअर करत म्हणाला…
हार्दिक-अक्षयाच्या रिसेप्शन सोहळ्यातील हा व्हिडीओ ‘फिल्मवाला’ या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. अक्षयानेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. हार्दिक-अक्षयाच्या विवाहसोहळ्यातील हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली राणादा-पाठकबाईंची जोडी खऱ्या आयुष्यात विवाहबद्ध झाल्याने चाहतेही खूश आहेत. हार्दिक-अक्षयाने सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.