Colors Marathi Serial Off Air : मराठी चित्रपटसृष्टीचे लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांची ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या प्रोग्रामिंग हेडपदी नियुक्ती झाल्यावर गेल्या काही महिन्यांत अनेक नवनवीन मालिकांची घोषणा करण्यात आली. आता लवकरच ‘अशोक मा.मा.’ आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या दोन नवाकोऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत्या २५ नोव्हेंबरपासून येणार आहेत. पण, यासाठी एक जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा आहेत.

‘अशोक मा.मा.’ या मालिकेतून महाराष्ट्र भूषण लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ टेलिव्हिजनवर पुनरागमन करणार आहेत. ही मालिका २५ नोव्हेंबरपासून रोज रात्री ८.३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. या वेळेला सध्या ‘अबीर गुलाल’ ही मालिका टेलिकास्ट केली जाते. ‘अशोक मा.मा.’ मालिकेची तारीख अन् वेळ जाहीर झाल्यावर ‘अबीर गुलाल’ मालिका संपणार की वेगळ्या वेळेला चालू राहणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. अशातच मुख्य अभिनेत्याने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे मालिका संपणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा : अवधूत गुप्तेने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर! किंमत तब्बल ‘इतके’ कोटी, १६ व्या मजल्यावर आहे फ्लॅट

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर ‘अबीर गुलाल’ या मालिकेत अगस्त्य ही प्रमुख भूमिका साकारत आहे.. त्याच्या सोबतीला गायत्री दातार आणि पायल जाधव या दोन अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. नव्या मालिकेला ८.३०चा स्लॉट दिल्याने आणि अक्षय केळकरच्या पोस्टमुळे ‘अबीर गुलाल’ ही मालिका आता अवघ्या ६ महिन्यांत प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा आहेत. २७ मे पासून ही मालिका सुरू झाली होती.

मे महिन्याच्या अखेरीस ‘अबीर गुलाल’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. याबद्दल अक्षय लिहितो, “अगस्त्य म्हणून शेवटचे काही दिवस…अगस्त्यला भरभरून प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अगस्त्य मला दिल्याबद्दल कलर्स मराठीचे मनापासून आभार. I love You मी फक्त तुमचाच आहे.”

हेही वाचा : ‘Love लग्न लोचा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला! चित्रपटात दमदार कलाकारांची मांदियाळी, प्रमुख भूमिकेत झळकणार ‘ही’ फ्रेश जोडी…

अक्षय केळकर मालिका सोडणार की मालिका बंद होणार असे प्रश्न अभिनेत्याला कमेंट्समध्ये त्याच्या चाहत्यांनी विचारले आहेत. आता येत्या काळात ‘अबीर गुलाल’ मालिका संपणार की अक्षय केळकर मालिकेतून एक्झिट घेणार हे लवकरच स्पष्ट होईल.

Story img Loader