Colors Marathi New Serial : छोट्या पडद्यावर टीआरपीच्या शर्यतीत सातत्य राखण्यासाठी जोरदार चढाओढ चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीने टीआरपी वाढवण्यासाठी गेल्या काही महिन्यांमध्ये सगळ्या जुन्या मालिका बंद केल्या आणि ‘सुख कळले’, ‘अबीर गुलाल’, ‘अंतरपाट’ यांसारख्या नव्या मालिका सुरु केल्या. या पाठोपाठ कलर्सवर बहुप्रतीक्षित ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वाची नुकतीच सुरुवात झालेली आहे. यंदा या पर्वाची जबाबदारी रितेश देशमुख सांभाळणार आहे. सर्वत्र ‘बिग बॉस मराठी’ची चर्चा चालू असताना वाहिनीने प्रेक्षकांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे.
मालिकांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. दररोज संध्याकाळी घराघरांत मालिका पाहिल्या जातात. टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना ऐतिहासिक त्यातही देवी-देवतांच्या मालिका, त्यांचा इतिहास जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते. याच पार्श्वभूमीवर आता कलर्स मराठी वाहिनीने एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे.
हेही वाचा : Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’च्या घरात एकूण १६ स्पर्धकांची एन्ट्री! पाहा संपूर्ण यादी, जाणून घ्या नावं
‘कलर्स मराठी’वर सुरू होणार नवीन मालिका ( Colors Marathi )
‘कलर्स मराठी’वर ( Colors Marathi ) तब्बल ६ वर्षे ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ही मालिका चालू होती. यानंतर आता लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याद्वारे अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानीची गाथा उलगडण्यात येणार आहे. मालिकेची पहिली झलक नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी ‘आई तुळजाभवानी’ ही नवीन मालिका नेमकी केव्हा सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. वाहिनीने ( Colors Marathi ) मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख व कलाकारांची नावं गुलदस्त्यात ठेवली आहेत. केवळ याची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. पहिल्याच टीझरमध्ये जबरदस्त व्हीएफएक्स पाहायला मिळत आहेत. नेटकऱ्यांनी यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा : आर्चीच्या घरी आली नवी पाहुणी! रिंकू राजगुरुने खरेदी केली हक्काची पहिली गाडी, फोटो शेअर करत म्हणाली…
दरम्यान, नव्या मालिकेची घोषणा झाल्यावर आता कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. काही नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये याबद्दल प्रश्न देखील विचारले आहेत. तर अन्य काही युजर्सनी “खूप वर्षांपासून या मालिकेची वाट पाहत होतो”, “खूप छान मालिका”, “देवी आईचा उदो उदो” अशा प्रतिक्रिया देत नव्या मालिकेचं कौतुक केलं आहे.