छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीत आघाडी मिळवण्यासाठी लोकप्रिय वाहिन्यांमध्ये नेहमीच चढाओढ सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या काही दिवसांपासून ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर अनेक बदल करण्यात आले आहेत. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘कलर्स मराठी’चे प्रोग्रामिंग हेड म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर नवनवीन मालिकांची घोषणा करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यांत त्यांची ‘इंद्रायणी’ ही पहिली नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. यानंतर स्पृहा जोशीची प्रमुख भूमिका असलेली ‘सुख कळले’ मालिकेचा शुभारंभ नुकताच पार पडला. याशिवाय २७ एप्रिलपासून ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कॉमेडी कार्यक्रमाची वाहिनीवर सुरुवात होणार आहे. अशातच आता वाहिनीकडून आणखी एका नवीन मालिकेची घोषणा करण्यात आली आहे.
‘अबीर गुलाल’ असं नवीन मालिकेचं नाव असून याचा पहिला प्रोमो नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. “दोन अनोळखी मुलींचं नशीब बदलणारी ती रात्र” यावर आधारित या मालिकेचं कथानक असणार आहे. प्रोमोमध्ये केवळ दोन तान्ह्या बाळांची झलक पाहायला मिळाली. परंतु, या मालिकेत कोणते कलाकार झळकणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. वाहिनीने कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवली असून आता पुढचा प्रोमो केव्हा प्रदर्शित होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा : जगभरात धुमाकूळ घालणारं ‘गुलाबी साडी’ गाणं कधी लिहिलं? जळगावचा संजू राठोड म्हणतो, “दिवाळीच्या दिवशी…”
‘अबीर गुलाल’ ही लोकप्रिय मालिका कलर्स कन्नडा वाहिनीची सुपरहिट मालिका ‘लक्षणा’चा रिमेक असणार आहे. त्यामुळे आता ही नवीन मालिका केव्हा सुरू होणार आणि नवीन मालिका सुरू झाल्यावर वाहिनीची कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.