छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शो प्रचंड लोकप्रिय आहे. आतापर्यंत ‘बिग बॉस मराठी’चे चार सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या शोचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आता नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली होती. परंतु, ‘कलर्स मराठी’ वाहिनीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमुळे लवकरच ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन चालू होणार असल्याच्या चर्चांना उधाण आहे.
‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन केव्हा येणार? याबद्दल अनेक प्रेक्षकांकडून वाहिनीकडे सतत विचारणा केली जात होती. आता समोर आलेल्या नव्या प्रोमोनुसार लवकरच हा शो पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर करत २१ मे रोजी पुन्हा एकदा नव्याने सुरू होणाऱ्या रिअॅलिटी शोची घोषणा करणार असं म्हटलं आहे.
हेही वाचा : Video : ‘मुरांबा’ फेम सुलेखा तळवलकरांनी घेतली नवीन गाडी! म्हणाल्या, “कपड्यांनी भरलेल्या वॉर्डरोबपेक्षा…”
वाहिनीने नव्या शोची घोषणा करत कॅप्शनमध्ये “सर्व रिअॅलिटी शोजचा बाप, पुन्हा येतोय सर्वांना वेड लावायला! पहिली झलक पहा उद्या २१ मे रोजी सकाळी १० वाजता कलर्स मराठी चॅनेलवर” असं नमूद केलं आहे. या प्रोमोमुळे नेटकऱ्यांनी ‘बिग बॉस मराठी’ पुन्हा सुरू होणार असा अंदाज बांधला आहे. या पोस्टवर असंख्य नेटकऱ्यांनी ‘बिग बॉस’, ‘बिग बॉस मराठी’, ‘बिग बॉस ५’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
हेही वाचा : “मतदानासाठी ६ तासांचा प्रवास करून आले, पण…”, ‘पारू’ फेम अभिनेत्री का झाली नाराज? पोस्ट शेअर करत म्हणाली…
‘बिग बॉस मराठी’चं हे यंदाचं पाचवं पर्व असणार आहे आणि वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सुद्धा पाचपासून मागे काऊंटडाऊन केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता अधिकृतपणे कोणत्या शोची घोषणा केली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. २१ मे रोजी सकाळी बरोबर १० वाजता चाहत्यांना यासंदर्भातील नवीन अपडेट मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चे होस्ट म्हणून गेल्या चार पर्वांप्रमाणे पुन्हा एकदा महेश मांजरेकरांना पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. आता पाचव्या सीझनची घोषणा झाल्यास पुन्हा एकदा होस्ट तेच असणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या आतापर्यंत पार पडलेल्या पर्वांबद्दल सांगायचं झालं तर, पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे, दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे, तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकम, तर चौथ्या पर्वाच्या विजेतेपदावर अक्षय केळकरने नाव कोरलं होतं.
© IE Online Media Services (P) Ltd