काही दिवसांपूर्वी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अंतरपाट’ मालिकेने प्रेक्षकांच्या अचानक निरोप घेतला. अवघ्या ७६ भागांतच या मालिकेचा गाशा गुंडाळण्यात आला. याच मुख्य कारण होतं टीआरपी. सध्या टीआरपी हा अत्यंत महत्त्वाचा भाग झाला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून टीआरपी अभावी अनेक मालिका बंद करण्यात आल्या आहेत. ‘अंतरपाट’नंतर कलर्स मराठीची ‘सुख कळले’ मालिकेने देखील प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री स्पृहा जोशी, सागर देशमुख, स्वप्नील परांजपे, आशय कुलकर्णी, स्वाती देवल अशी जबरदस्त कलाकार मंडळी असलेली ‘सुख कळले’ मालिका एप्रिल महिन्यात सुरू झाली होती. पण टीआरपी कमी असल्यामुळे पाच महिन्यांतच मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी ‘कलर्स मराठी’ दुसऱ्या बाजूला नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. ‘आई तुळजाभवानी’ या नव्या मालिकेनंतर ‘कलर्स मराठी’ने आणखी एका नव्या मालिकेची नुकतीच घोषणा केली. या नव्या मालिकेचा जबरदस्त प्रोमो समोर आला आहे.

‘कलर्स मराठी’च्या नव्या मालिकेचं नाव ‘लय आवडतेस तू मला’ असं आहे. या मालिकेत ‘लवंगी मिरची’ फेम अभिनेता तन्मय जक्का आणि सानिका मोजर प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल झन्नाट, रांगडी प्रेमकथा ‘कलर्स’च्या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – ‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम रेश्मा शिंदेने ‘या’ ठिकाणी सुरू केला स्वतःचा व्यवसाय; श्रद्धा कपूरशी आहे खास कनेक्शन

‘लय आवडतेस तू मला’ मलिकेच्या प्रोमोमध्ये कळशी आणि साखरगाव अशी दोनं गावं पाहायला मिळत आहेत. या दोन्ही गावातील गावकरी एका व्यक्तीला शोधत आहेत. ती व्यक्ती म्हणजेच मालिकेचा नायक आहे. मालिकेतील नायकाची एन्ट्री बुलेटवरून दमदार दाखवण्यात आली आहे. ‘बिनधास्त हात ठेव’ असं त्याच्या शर्टवर मागे लिहिलं आहे. नायक गावकऱ्यांना चकवा देऊन पळून जात असतो. यावेळी गावातली मुलं विहिरीत पडलेल्या मांजरीला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. हीच मुलं नायकाला वाचवण्यासाठी बोलावतात. त्यामुळे नायक मुलांच्या मदतीला धावून जातो. विहिरीत पडलेल्या मांजरीला बाहेर काढतो आणि बघतो तर मांजरी बरोबर नायिकाची एन्ट्री दाखवली आहे.

त्यानंतर सुंदर नायिकेला पाहून नायक भुरळून जातो. त्याच्या हातून विहिरीचा दोरचं सुटतो. त्यामुळे नायिका विहिरीत पडते. पण तितक्यात नायक तिला वाचवतो. ‘सुंदरी एवढी सुंदर असलं असं वाटलं नव्हतं राव”, असं नायक म्हणतो. तेव्हा नायिका म्हणते, ‘सुंदरी त्या मांजरीचं नाव आहे. खेच वर.’ त्यानंतर नायक-नायिकेची ओळख होते. ‘सानिका’ असं नायिकेच्या व्यक्तिरेखेचं नाव असून ती साखरगावाच्या साहेबरावांची मुलगी असते. तर नायक स्वतःची ओळख सरकार म्हणून करून देतो; जो कळशीचा छावा असतो. अशा या दोन गावातील रांगडी प्रेमकथा ‘लय आवडतेस तू मला’ मालिकेत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – संकर्षण कऱ्हाडेच्या नाटकाला कतारमध्ये प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, अनुभव सांगत म्हणाला, “परभणीच्या काद्राबादमध्ये राहायचो तेव्हा…”

दरम्यान, ‘कलर्स मराठी’च्या नव्या मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख अन् वेळ गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. पण ‘लय आवडतेस तू मला’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colors marathi announces new serial lai aavdtes tu mala watch promo pps