Bigg Boss Marathi Season 5: ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व चांगलंच गाजलं. ७० दिवसांच्या या पर्वात एकूण १७ सदस्य सहभागी झाले होते. लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुखने आपल्या दमदार शैलीत ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचं सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती. रितेशच्या ‘भाऊच्या धक्क्या’ने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचाला रंगत आणली. हा ‘भाऊचा धक्का’ पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये नेहमी उत्सुकता असायची. रितेश आता कोणाची कान उघडणी करतोय? आणि कोणाची शाळा घेतोय? याची सातत्याने चर्चा व्हायची.
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात पहिल्या दिवसापासून भांडणं पाहायला मिळाली. कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत सदस्यांमध्ये भांडण व्हायचं. पण, या पर्वातील सदस्यांनी अक्षरशः राडा केला. काही जण खूप ट्रोल झाले. विशेष म्हणजे ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या टीआरपीने बरेच रेकॉर्ड मोडले. तसंच रितेश देशमुखच्या ‘भाऊच्या धक्क्याला’देखील सर्वाधिक टीआरपी मिळाल्याचं पाहायला मिळालं. ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वात सर्व नाती बनली होती. कोणामध्ये चांगलं मैत्रीत्व झालं, तर कोणी भाऊ-बहीण झालं. हे पर्व संपून ६ फेब्रुवारीला चार महिने पूर्ण होतील. पण, या घरात बनलेली नाती अजूनही घराबाहेर पाहायला मिळत आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला. तर अभिजीत सावंत उपविजेता झाला आणि निक्की तांबोळी तिसऱ्या स्थानावरून बाद झाली. आता ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतंच ‘कलर्स मराठी ‘वाहिनीने याबाबत घोषणा केली आहे.
‘कलर्स मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा प्रोमो शेअर करत हे पर्व पुनःप्रक्षेपण होतं असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा तोच राडा, ‘भाऊचा धक्का’ पाहायला मिळणार आहे. १० फेब्रुवारीपासून ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचं पुनःप्रक्षेपण होणार आहे. दररोज दुपारी ३ वाजता ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर हे पर्व प्रसारित होणार आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचं पुनःप्रक्षेपण होतं असल्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. ‘एक नंबर’, ‘कडक’, ‘बाई काय हा प्रकार’, ‘सूरज चव्हाणची एन्ट्री’, अशा प्रतिक्रिया चाहत्यांच्या उमटल्या आहेत.