Colors Marathi : सध्या छोट्या पडद्यावर टीआरपीसाठी मोठी चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी वाहिन्यांकडून नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात. महाएपिसोड्स, नव्या कलाकारांची एन्ट्री, महासंगम असे बरेच ट्रेंड सध्या छोट्या पडद्यावर आले आहेत. याशिवाय रविवार पार पडणारे महामालिकांचे विशेष भाग हा नवीन ट्रेंड गेल्या काही महिन्यांमध्ये वाहिन्यांवर सुरू झाला आहे.
सध्या ‘स्टार प्रवाह’वरील मालिका सातही दिवस प्रसारित केल्या जात आहेत. तसेच ‘झी मराठी’वर सुद्धा रविवारी मालिकांचे विशेष भाग पाहायला मिळतात. आता ‘झी मराठी’ आणि ‘स्टार प्रवाह’ पाठोपाठ ‘कलर्स मराठी’ वाहिनीने सुद्धा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रविवारची सुट्टी आता प्रेक्षकांसाठी अजून खास होणार आहे. कारण, आता ‘कलर्स मराठी’वरील मालिका रविवारी सुद्धा प्रसारित केल्या जाणार आहेत.
‘कलर्स मराठी’ वाहिनीवर रविवारी दुपारी आणि संध्याकाळी सुद्धा मालिका पाहायला मिळणार आहेत.
‘इंद्रायणी’ रंजना पगारे ही नवीन एन्ट्री होणार आहे. तिचं आणि गोपाळचं नातं नेमकं काय आहे? मैत्री की त्यापेक्षाही काहीतरी खास ? रंजनाच्या येण्याने गोपाळ आणि इंद्रायणीच्या मैत्रीवर काय परिणाम होईल, हे पाहणं रंजक ठरणार आहे. ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेत वल्लरीला श्वेताच्या फोनमध्ये अनिमेशबद्दलचा काही पुरावा मिळतो का? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
‘अशोक मा.मा.’ मालिकेत भैरवीच्या मदतीला येणार आहे फुलराणी. आता फुलराणीच्या येण्याने मालिकेत मस्ती आणि धम्माल होणार हे नक्की. ‘लय आवडतेस तू मला’ या मालिकेत कमलच्या अपहरणामागाचं सूत्रधार कोण? आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यात सरकार- सानिकाला यश मिळेल का? गुन्हेगार कोण आहे हे सत्य सरकार- सानिका समोर येईल का? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.
‘आई तुळजाभवानी’ मालिकेत महिषासुराला कळणार का की तुळजा म्हणजेच देवी तुळजाभवानी आहे? याचा थरारक उलगडा होणार आहे. ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत स्वामी चरित्र अध्यायातला स्वामींच्या आजारपणाचा लक्षणीय टप्पा उलगडणार असून, या स्वामी-लीलेची सुरुवात होणार आहे.