छोट्या पडद्यावरील प्रत्येक वाहिनीमध्ये सध्या टीआरपीसाठी चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘स्टार प्रवाह’, ‘झी मराठी’ या वाहिन्यांनी गेल्या काही दिवसांत अनेक नवीन मालिकांची घोषणा केली आहे. आता या पाठोपाठ ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर देखील येत्या काही दिवसांत एक नवीन मालिका सुरू होणार आहे. नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.
कलर्स मराठीवर येत्या २५ मार्चपासून ‘इंद्रायणी’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे. यामध्ये बालकलाकार सांची भोयर प्रमुख भूमिका साकारणार आहे. याशिवाय यामध्ये कोणकोणते कलाकार झळकणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर वाहिनीने शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये मालिकेतील काही कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : स्टार प्रवाहवर सुरू होणार नवीन मालिका, ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत झळकणार ‘हे’ कलाकार, प्रोमो आला समोर
‘इंद्रायणी’ मालिकेत प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री अनिता दाते ‘इंद्रायणी’मध्ये प्रमुख भूमिका साकारेल हे नव्या प्रोमोमधून स्पष्ट झालं आहे. ही मालिका नेमकी कोणत्या वेळेला प्रसारित केली जाणार याबद्दल कलर्स मराठी वाहिनीकडून लवकरच माहिती देण्यात येईल.
दरम्यान, दिग्दर्शक व कलर्स मराठीचे प्रोगामिंग हेड केदार शिंदे यांनी १३ फेब्रुवारी रोजी ‘इंद्रायणी’ या नव्या मालिकेची घोषणा केली. त्यामुळे या मालिकेत आता काय पाहायला मिळणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.