कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं नाव आहे ‘इंद्रायणी’. यामध्ये प्रमुख भूमिका बालकलाकार सांची भोईर साकारणार आहे. मालिकेचा प्रोमो समोर आल्यापासून सालस तरीही खोडकर अशा ‘इंदू’ने सगळ्याच प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे.
मूर्ती लहान परंतु तिला पडणारे प्रश्न किती महान आहेत, हे आपण प्रोमोमध्ये पाहिलंच आहे. तिचे मार्मिक प्रश्न मोठमोठ्यांना अचंबित करणारे आहेत. तितकेच विचार करायलाही भाग पाडणारे आहेत अशी ही निरागस, गोंडस आणि निष्पाप इंदू संपूर्ण गावाची म्हणजेच विठू वाडीची लाडकी आहे. लवकरच सर्वांची लाडकी इंदू म्हणजेच ‘इंद्रायणी’ आपल्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘इंद्रायणी’ या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. आता इंदूची भूमिका साकारणारी सांची भोईर नेमकी कोण आहे जाणून घेऊयात…
हेही वाचा : Video : “तुला मुलगी झाल्याचं ऐकलं…”, विराट कोहलीने दुरुस्त केली एलन वॉकरची ‘ती’ चूक; व्हिडीओ व्हायरल
सांची ही मूळची साताऱ्यातील कराड गावची आहे. तिला लहानपणापासूनच अभिनय व नृत्याची आवड आहे. यापूर्वी सांचीने ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेत काम केलं आहे. याशिवाय ती केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात झळकली आहे. यामध्ये तिने शाहिरांच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती. आता सांची इंदूच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा : “Happy Birthday पाटील”, हेमंत ढोमेच्या वाढदिवशी क्षिती जोगची खास पोस्ट, नवऱ्याबद्दल म्हणाली…
दरम्यान, सांची भोईरसह अनिता दाते, संदीप पाठक स्वानंद बर्वे, आयुष उलगड्डे, राघव घाडगे यांच्या या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका आहेत. २५ मार्चपासून सायंकाळी ७ वाजता ‘इंद्रायणी’ मालिका कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.