Colors Marathi Pinga Ga Pori Pinga New Serial : छोट्या पडद्यावर येत्या काळात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याचे प्रोमो एक-एक करून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. गेल्या काही दिवसांत ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या ‘आई तुळजाभवानी’, ‘लय आवडतेस तू मला’, ‘अशोक मा.मा’ या तीन मालिकांच्या प्रोमोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अशातच ‘बिग बॉस’चा पाचवा सीझन अंतिम टप्प्यात असताना वाहिनीने ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या नव्या मालिकेची घोषणा केली होती. या नव्या मालिकेत एकूण पाच अभिनेत्री झळकणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘रमा माधव’ फेम अभिनेत्री ऐश्वर्या शेटे ( वल्लरी ) या मालिकेच्या निमित्ताने वाहिनीवर पुनरागमन करणार आहेत. तर तिच्यासह या मालिकेत विदिशा म्हसकर ( तेजा ), शाश्वती पिंपळीकर ( प्रेरणा ), प्राजक्ता परब ( मिथिला ), आकांक्षा गाडे ( श्वेता ) अशा एकूण पाच अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

हेही वाचा : “लिप फिलर है क्या…”, Bigg Boss फेम आर्याचा नवीन रॅप चर्चेत; नाव न घेता सणसणीत टोला, रोख निक्कीकडे?

‘कलर्स मराठी’च्या ( Colors Marathi ) नव्या मालिकेत प्रेक्षकांना एकाच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या पेइंग गेस्ट म्हणजेच रुममेट्स असणाऱ्या पाच मैत्रिणींची गोष्ट पाहायला मिळेल असं मालिकेच्या प्रोमोवरून स्पष्ट होत आहे. मात्र, या पाच मैत्रिणींची मैत्री होण्यापूर्वी यांच्यात सुरुवातीला गैरसमज निर्माण झाल्याचं नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

प्रेरणा, तेजा, मिथिला आणि श्वेता आधीपासून एकत्र राहत असतात. अचानक एके दिवशी प्रेरणा या तिघींना सांगते, “इथे आणखी मुलगी येतेय… ती या घरातली पाचवी पेइंग गेस्ट असेल.” ही पाचवी पेइंग गेस्ट म्हणून एन्ट्री घेते वल्लरी. घरात वल्लरीची एन्ट्री झाल्यावर तिच्यावर चोरीचा आळ येतो. तेजा तिला म्हणते, “तू प्रेरणाचे पैसे चोरलेस” यानंतर वल्लरीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो कारण, ती दोषी नसल्याचं प्रोमोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. आता या पाच जणींची गैरसमजातून घट्ट मैत्री कशी होते हे मालिका सुरू झाल्यावर पाहायला मिळेल.

हेही वाचा : Bigg Boss 18: “हे काय चाललंय?” सलमान खानच्या शोमधील तीन हॉट वाइल्ड कार्डची एन्ट्री पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, पाहा प्रोमो

‘पिंगा गं पोरी पिंगा’ ही नवीन मालिका येत्या २५ नोव्हेंबरपासून संध्याकाळी ७.३० वाजता ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे. सध्या या साडेसात वाजताच्या स्लॉटला ‘दुर्गा’ ही काही दिवसांपूर्वीच सुरू झालेली मालिका सुरू आहे. ‘दुर्गा’ मालिकेला सुरू होऊन अवघे तीन महिने उलटल्यामुळे ही मालिका संपणार की वेळ बदलणार? असे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले होते. अखेर, या मालिकेची मुख्य नायिका रुमानी खरे हिने “One last time…. Durga” असं कॅप्शन देत पोस्ट शेअर केल्यामुळे लवकरच ‘दुर्गा’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colors marathi new serial pinga ga pori pinga on air date and time watch new promo sva 00