मकरसंक्रांत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. १४ जानेवारीला हा सण अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. तीळगुळ किंवा तिळाचे लाडू देऊन गोड-गोड बोलण्याचा संदेश दिला जातो. त्यामुळे सध्या मकरसंक्रांत साजरी करण्यासाठी लगबग सुरू आहे. दुसऱ्या बाजूला मकरसंक्रांतीनिमित्ताने ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘#लय आवडतेस तू मला’ आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या दोन मालिकेचे एक तासाचे विशेष भाग पाहायला मिळणार आहेत.
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘#लय आवडतेस तू मला’ मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेमं दिलं. मालिकेमधील सरकार आणि सानिकाची जोडी, त्यांच्यातील मैत्री, भांडण, कडू – गोड आठवणी, त्यांचा आतापर्यंतचा प्रवास याचे प्रेक्षक साक्षी आहेत. सरकार-सानिकाने नेहेमीच त्यांच्यासमोर येणाऱ्या आव्हानांना खंबीरपणे उत्तर दिलं आहे. तर दुसरीकडे ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेतील पाच जणींची मैत्री, त्यांच्यावर येणारी संकटं, त्यांचं नातं, त्यांच्यातील भांडणं हेदेखील बघायला प्रेक्षकांना आवडत आहे. या मालिकेचा मकरसंक्रांती निमित्ताने एक तासाचा भाग रंगणार आहे.
हेही वाचा – लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
‘#लय आवडतेस तू मला’ मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. सानिकाने आपल्या प्रेमाची कबुली दिली असून तिला कुठेतरी वाटतं आहे राजा म्हणजेच सरकारने देखील त्याचं तिच्यावर प्रेम आहे हे कबुल करावं. पण, सरकारची काही कारणं आहेत त्यामुळे तो करू शकत नाहीये. यातच सर्वेश-सानिकाचा साखरपुडा होणार आहे. पण, आता सरकार-सानिकाच्या प्रेमावर पंकजा संक्रांत आणणार आहे. मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सरकारने सानिकासाठी लिहिलेली चिठ्ठी ती बदलताना दिसते आहे. येत्या १२ जानेवारीच्या विशेष भागामध्ये सरकार सानिकाला सत्य सांगायचे ठरवतो. तो कळशी गावचा असून अप्पासाहेबांचा मुलगा आहे. हे सत्य सांगितल्यावर त्याचे काय परिणाम होतील? सानिका कुठलं पाऊल उचलेल? हे नक्की बघा.
याबरोबर मालिकेत संक्रांत विशेष भागामध्ये पतंग उडविण्याची स्पर्धा रंगणार आहे, ज्यामध्ये सानिकाच्या टीममध्ये सरकार आणि सर्वेशच्या टीममध्ये पंकजा असणार आहे. या पतंग उडविण्याच्या स्पर्धेत आणि नात्यांच्या स्पर्धेत कोण बाजी मारणार? हे बघणं उत्सुकेतचं असणार आहे.
‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेत पिंगा गर्ल्सचा बिल्डर विरोधात लढा बघायला मिळणार आहे. बुलबुल बॅग वाचवण्यासाठी पाच जणी मैदानात उतरणार आहेत. बिल्डर वल्लरीला पैसे देतो. पण, तिला कळतं नाही असं त्याने का केलं असेल बरं? वल्लरीला त्याचं उत्तर कळतं, आणि ते ती पिंगा गर्ल्सना सांगते. आपल्यात फूट पडली आहे जे त्याला कळलं आहे आणि त्याचाच फायदा त्यानं घेतला आहे. यानंतर बिल्डर पिंगा गर्ल्सना धमकी देतो की दोन दिवसांत रस्त्यावर आणणार मग ते म्हतारे असो वा तरुण सगळे बाहेर येणार. पण, वल्लरी मात्र निडरपणे त्याला तोंड देते आणि त्याला रस्ता दाखवताना दिसली आहे.
त्यानंतर वल्लरी सर्व शेजाऱ्यांना प्रेरित करते. आता वल्लरी कसा उलट गेम खेळणार? कशी त्या बिल्डरला उत्तर देणार? हे बघणं रंजक असणार आहे. ‘कलर्स मराठी’वर १२ जानेवारीला मकरसंक्रांतीनिमित्ताच्या एक तासाच्या भागात हे सर्व पाहायला मिळणार आहे. ‘#लय आवडतेस तू मला’ दुपारी १ वाजता, संध्याकाळी ७.०० वाजता आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ दुपारी २ वाजता, रात्री ८.०० वाजता प्रसारित होणार आहे.