Bigg Boss Marathi 5 वे पर्व विविध कारणांमुळे सध्या गाजत असल्याचे दिसत आहे. या पर्वात अनेक गोष्टी बदलल्या आणि महत्त्वाचे म्हणजे या पर्वात बिग बॉसचे सूत्रसंचालक म्हणून पहिल्यांदाच रितेश देशमुख पाहायला मिळत आहे. त्यामुळे रितेश देशमुख कशा प्रकारे ही जबाबदारी पेलणार, हे पाहण्यासाठी बिग बॉसचे चाहते उत्सुक होते. आता कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे यांनी या शोबद्दल वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले केदार शिंदे?
कलर्स मराठी वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी नुकतीच नवशक्ती या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाच्या यशाबद्दल बोलताना त्यांनी म्हटले,” मी हिंदीचे सगळे सीझन बघितलेत आणि मराठीची चार पर्वही बघितलीत.”
तुम्ही स्वत: बिग बॉसचे चाहते आहात? यावर बोलताना त्यांनी म्हटले, “हो. म्हणजे मला आठवतं की, मला बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनसाठी कन्टेस्टंट म्हणून विचारलं गेलं होतं आणि आज हा बिग बॉस मराठीचा पूर्ण शो चालवण्याची संधी मला मिळतेय. पण, मी परत सांगतो की, तो एक संसार आहे. या संसारात मी प्रमुख असलो तरी माझी संपूर्ण टीम म्हणजे माझे शंभर-सव्वाशे लोक त्यासाठी दिवस-रात्र काम करत असते. आणि त्या प्रत्येकाचे ते यश आहे. हे यश रितेशभाऊंचं आहे. कारण- ज्या विश्वासानं मी त्यांना विचारलं, आम्ही कलर्स मराठी वाहिनीकडून त्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांनी होकार दिला. मग त्यांनी तो विश्वास सार्थही ठरवला.”
बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व पहिल्या दिवसापासूनच मोठ्या प्रमाणात गाजत असल्याचे दिसत आहे. या पर्वातील सदस्यांच्या निवडीपासून ते सूत्रसंचालक या सर्वांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले होते.
बिग बॉस मराठीचे याआधीच्या चार पर्वांचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते. त्यामुळे ही जबाबदारी रितेश देशमुख कशी पार पाडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, ज्या प्रकारे रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर चुकीचे वागणाऱ्या स्पर्धकांची ‘शाळा’ घेतो आणि योग्य खेळ खेळणाऱ्यांना शाबासकी देतो. ते बघून रितेश देशमुखचे कौतुक होताना दिसत आहे. आता बिग बॉसच्या घरात आगामी काळात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, केदार शिंदेंनी अनेक मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.