Bigg Boss Marathi 5 व्या पर्वाची वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चा झाली. स्पर्धक म्हणून कलाकारांपेक्षा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची जास्त असलेली संख्या, महेश मांजरेकरांऐवजी रितेश देशमुखकडे देण्यात आलेली सूत्रसंचालनाची जबाबदारी आणि याबरोबरच बिग बॉसच्या घराची बदलेली थीम या सगळ्यांची मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले.

सोशल मीडियावर बिग बॉस मराठीच्या घराचे रुप बदलेल्यामुळे मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. आता कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड आणि प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदेंनी यावर वक्तव्य केले आहे. त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली.

काय म्हणाले केदार शिंदे?

अमोल परचुरेंच्या युट्यूब चॅनेलला केदार शिंदेनी नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी घराच्या थीमविषयी बोलताना म्हटले, “आम्ही घर बदललं. कारण- मला वाटतं की आपल्याकडे हिंदी बघणारी लोकं आहेत. १०० टक्के आपल्या गोष्टींमधून मराठी संस्कृती दिसली पाहिजे. पण ती बिग बॉसमध्ये दाखवण्याची गरज नाही. बिग बॉसमध्ये भांडायचं आणि बाजूला तुळस ठेवलीय, हे कॉम्बिनेशन आहे का? ज्या घरात तुळस दिसते ते घर किती शांत असायला पाहिजे. त्यामुळे आम्ही गोष्टी ठरवून बदलल्या. लूक आम्ही २०२४ चा आताचा दिलाय आणि टास्क वैगेरे सगळ्या गोष्टी नव्याने डिझाइन करण्यात आल्या आहेत. दर आठवड्याला लोकांना काहीतरी नवीन पाहायला मिळायला पाहिजे, असा विचार आहे.” असे केदार शिंदेंनी म्हटले आहे.

याबरोबरच या मुलाखतीत केदार शिंदेंनी बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांच्या कास्टिंगबद्दल, सूरज, धनंजय पोवार, पंढरीनाथ कांबळे या सदस्यांबद्दल वक्तव्य केले आहे. सूरजबरोबर झालेली भेट कायम लक्षात राहिल असे त्यांनी म्हटले आहे. जर सत्या चित्रपटात मनोज बाजपेयी जरा जाडा असता तर धनंजय पोवारसारखा दिसला असता. असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: “डीपी मला ‘सत्या’ सिनेमातील भिकू म्हात्रे वाटतो”, प्रसिद्ध दिग्दर्शकाचे धनंजय पोवारबद्दल वक्तव्य; म्हणाले, “मनोज बाजपेयी जर …”

रितेश देशमुख ज्या पद्धतीने सूत्रसंचालन करत आहेत, ते कौतुकास्पद आहे, असे म्हणत त्यांनी रितेश देशमुखच्या कामाचे कौतुक केले आहे.

दरम्यान, बिग बॉस मराठीचे ५ वे पर्व सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. हे पर्व ७० दिवसांत संपणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबरोबरच, वैद्यकीय कारणांमुळे संग्राम चौगुले आणि कमी मत मिळाल्यामुळे अरबाज पटेल घराबाहेर पडले आहेत. आता घरात असणाऱ्या स्पर्धकांपैकी कोणता सदस्य प्रेक्षकांचे मन जिंकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.