विनोदी भूमिका आणि अशोक सराफ हे प्रेक्षकांचे आवडते समीकरण आहे. मात्र, सध्या अभिनेते अशोक सराफ(Ashok Saraf) एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. कलर्स मराठी वाहिनीवरील अशोक मा. मा. या मालिकेत ते प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. या मालिकेत त्यांनी कडक शिस्तीच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे, त्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे अनेक जण त्यांना खडूस समजतात.
अनेकदा ते कठोर निर्णय घेतात. या सगळ्यामुळे त्यांच्या जवळची माणसे दुखावली जातात. अनेकदा नातवंडे आणि त्यांच्यात संघर्ष चालू असलेला दिसतो. या मालिकेचे आता १०० भाग पूर्ण झाले आहेत. मालिकेत अशोक सराफ यांच्यासह नेहा शितोळे, रसिका वाखारकर प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. या मालिकेत कौटुंबिक नातेसंबंध, प्रेमळ मामा, नातवंडांवरील त्यांचे प्रेम आणि त्याच्या भावविश्वाची गोष्ट पाहायला मिळते.
‘अशोक मा. मा.’ या मालिकेसह कलर्स मराठी वाहिनीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेचेदेखील १०० भाग पूर्ण झाले आहेत. या मालिकेत पाच मैत्रिणींची मैत्री दाखवण्यात आली आहे. ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेत ऐश्वर्या शेटे, आकांक्षा गाडे, शाश्वती पिंपळीकर, प्राजक्ता परब आणि विधिषा म्हसकर या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या पाच मैत्रिणींच्या आयुष्यात सतत काही ना काही घडताना दिसते, त्यावर एकत्र येत त्या मार्ग काढताना दिसतात. काही वेळेला त्यांच्यात गैरसमजही निर्माण होतात, मात्र पुन्हा त्या एकमेकींसाठी एकत्र येतात.


मराठी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलेल्या दोन गाजलेल्या मालिका— ‘पिंगा गं पोरी पिंगा’ आणि ‘अशोक मा.मा.’ या दोन मालिकांनी नुकताच १०० भागांचा टप्पा गाठला. या प्रवासात दोन्ही मालिकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभले आहे. दोन्ही मालिकांच्या सेटवर संपूर्ण टीमबरोबर केक कट करून आनंद साजरा करण्यात आला. १०० भागांचा हा यशस्वी टप्पा पार करताना संपूर्ण टीमचा उत्साह द्विगुणित झाला. मालिकांच्या पुढील प्रवासासाठी प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्याची साथ अशीच लाभत राहो, अशी मनोकामना मालिकांच्या टीमने केली.