‘कलर्स मराठी’ (Colors Marathi) वाहिनीवरील काही लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘सुंदरा मनामध्ये भरली’(Sundara Manamadhe Bharli). मालिकेत अभिनेत्री अक्षया नाईक, समीर परांजपे, कुणाल धुमाळ, अतिशा नाईक, प्रकाश धोत्रे, गार्गी थत्ते-फुले, गौरी किरण, हृषिकेश शेलार अशी अनेक कलाकार मंडळी पाहायला मिळाली होती. लतिका आणि अभिमन्यूच्या मुख्य भूमिकेत अभिनेत्री अक्षया नाईक व समीर परांजपे हे मुख्य कलाकार होते. त्यांची हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांचा खूपच आवडली होते.

अशातच या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे ही मालिका आता पुन्हा एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका आता हिंदीमध्ये पाहायला मिळणार आहे. नुकतीच याबद्दल माहिती देण्यात आली आहे. ‘मराठी सीरियल्स ऑफिशिअल’ या इन्स्टाग्राम पेजद्वारे या मालिकेच्या रिमेकबद्दल सांगण्यात आलं आहे.

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मराठी मालिकेचा हिंदी रिमेक होणार असून हिंदीमध्ये या मालिकेचं नाव ‘मेरी भव्य लाइफ’ असं असणार आहे. कलर्स टीव्ही या हिंदी वाहिनीवर ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. खेळकर, शाळेपासून अभ्यासात हुशार आणि दिसायलाही सुंदर अशी या मालिकेची नायिका आहे. मात्र इतकं सगळं असूनदेखील निव्वळ शरीराने लठ्ठ असल्याने लहानपणापासून या नायिकेला समाजाकडून टोमणे ऐकावे लागतात आणि याचमुळे तिचे लग्नदेखील जमत नाही.

याउलट दिसायला देखणा, हुशार, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा असा फिटनेस फ्रिक नायक आहे. स्वत: फिट असलेल्या या नायकाला त्याची स्वत:ची व्यायामशाळा सुरू करायची आहे. याच नायक आणि नायिकेचं म्हणजे अभिमन्यूचं आणि लतिकाचं लग्न होतं? मग लग्नानंतरचा रंजक प्रवास या मालिकेतून पाहायला मिळाला होता.

दरम्यान, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील कलाकार आता वेगवेगळ्या मालिकेत पाहायला मिळत आहेत. हृषिकेश शेलार सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तर समीर परांजपे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेत प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. शिवाय अभिनेत्री अतिशा नाईक यादेखील स्टार प्रवाहच्याच ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत आहेत.