मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांची काही महिन्यांपूर्वीच कलर्स मराठी वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर गेल्या काही महिन्यांपासून वाहिनीवर अनेक बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. ‘इंद्रायणी’, ‘सुख कळले’, ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ असे नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आता नव्या मालिका सुरू झाल्यावर एक जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या २२ एप्रिलपासून स्पृहा जोशीची ‘सुख कळले’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेला वाहिनीकडून ९ चा स्लॉट देण्यात आला आहे. ‘सुख कळले’च्या निमित्ताने स्पृहा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करायला सज्ज झाली आहे. या नव्या मालिकेमुळे ‘रमा राघव’ मालिकेची वेळ बदलून रात्री ९.३० अशी करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या दररोज साडेनऊला प्रसारित केली जाणारी ‘भाग्य दिले तू मला’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
हेही वाचा : “राघवला सिनेमातलं अन् मला राजकारणातलं…”, परिणीती चोप्राने नवऱ्याची केली गोड तक्रार; म्हणाली…
‘भाग्य दिले तू मला’ मालिकेतील राज-कावेरीच्या जोडीला गेली दोन वर्षे प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ४ एप्रिल २०२२ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता लवकरच ही मालिका बंद होणार आहे. अभिनेत्री भाग्यश्रीने या मालिकेच्या व्रॅपअप पार्टीचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
हेही वाचा : “माझं अजून लग्न झालेलं नाही त्यामुळे लोक…”, ‘रमा राघव’ फेम अभिनेत्रीने शेअर केला अनुभव
“खूप सुंदर टीम आणि छान माणसं या लोकांबरोबर काम करून खूप समाधान मिळालं. ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेच्या सगळ्या टीमचं खूप खूप अभिनंदन…थँक्यू मला पियू ही भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल” अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने मालिकेची संपूर्ण टीम, तन्वी, विवेक, निवेदिता सराफ यांचे आभार मानले. शूटिंगच्या शेवटच्या दिवसाच्या पार्टीला सगळेच कलाकार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस नुकताच सेटवर साजरा करण्यात आला. यासाठी खास व्रॅपअप पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. सेटवर केप कापून या कलाकारांनी सगळ्या आठवणी फोटोच्या स्वरुपात जपून ठेवल्या. दरम्यान, आवडती मालिका निरोप घेणार असल्याचं कळताच ‘भाग्य दिले तू मला’चे प्रेक्षक काहीसे नाराज झाले होते. परंतु, आता लवकरच याजागी स्पृहा जोशीची नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.