मराठी मालिकाविश्वात सध्या टीआरपी हा महत्त्वाचा झाला आहे. एखाद्या मालिकेला टीआरपी चांगला असेल तर ती मालिका जास्त काळ चालते. पण जर मालिकेला टीआरपी नसेल तर ती मालिका काही महिन्यात गुंडाळली जाते. अशाच दोन मालिकांनी दोन दिवसात अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. एक म्हणजे ‘कस्तुरी’ आणि दुसरी म्हणजे ‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिका. ‘कलर्स मराठी’ वाहिनीने या दोन्ही मालिका अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण यामुळे प्रेक्षक वर्ग नाराज झाला असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
बहीण-भावाची सुंदर गोष्ट असलेली ‘कस्तुरी’ ही २६ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. पण १३ ऑक्टोबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करून ऑफ एअर करण्यात आली. अवघे तीन महिने ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करून शकली. असं असतानाच ‘योगयोगेश्वर जय शंकर’ ही मालिका देखील ऑफ एअर करण्यात आली.
शंकर महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेली ‘योगयोगेश्वर जय शंकर’ ही मालिका मे २०२२ला सुरू झाली होती. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. सुरुवातीला बालपणीच्या शंकर महाराजांची कथा दाखवण्यात आली. बालकलाकार आरुष बेडेकर याने बालपणीच्या शंकर महाराजांची भूमिका साकारली होती. त्यानंतर यावर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात शंकर महाराज जीवनचरित्राच्या महाअध्यायाचा आरंभ झाला. मालिकेतील शंकर महाराज मोठे झाले. मोठ्या शंकर महाराजांची भूमिका अभिनेता संग्राम समेळने उत्तमरित्या निभावली. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी संग्राम तब्बल ९ महिने आपल्या कुटुंबापासून दूर राहिला होता. काही दिवसांपूर्वीच तो घरी परतला. पण असं असताना कमी टीआरपीमुळे ही मालिका अचानक बंद करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला. १४ ऑक्टोबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला. पण आता प्रेक्षक वर्ग संताप व्यक्त करून वाहिनीचा जाहीर निषेध करत आहेत.
हेही वाचा – अभिनेत्री जुई गडकरीला चिडवतात ‘गाववाली’? का ते जाणून घ्या..
‘कलर्स मराठी’ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवर प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. एका प्रेक्षकाने लिहीलं, “हे खूप चुकीचं आहे. ही काय डेली सोप नव्हती की टीआरपीमुळे मालिका बंद केली. नको त्या बकवास मालिका चालू ठेवल्यात. त्या नको त्या फालतू मालिकांमुळे वेळ पण बदलली. यावरून हेच कळतं की, कोणतीही वाहिनी असुदे या लोकांना फक्त पैशांची मतलब आहे आणि आपल्यासारखे लोक यांच्या मालिका बघून टीआरपी वाढवतो. यांचाच फायदा होतो. असं असेल तर कोणत्याच देवांच्या मालिका काढू नका. देवाची मालिका काढायची या अशा वाहिन्यांची लायकीच नाही. परत असं करूही नका. कलर्स मराठी जाहीर निषेध.” तर दुसऱ्या प्रेक्षकाने लिहीलं, “बाकीच्या वाहिनीवरचे आध्यात्मिक मालिकेचे ९००, १००० भाग होतात. पण तुम्ही एका मालिकेचे पाचशे भाग पण पूर्ण नाही दाखवले. आपल्याच संतांच्या कथा तुम्हाला नीट दाखवता येत नाही, या गोष्टीचा खेद आहे.”
हेही वाचा – स्टार प्रवाहवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही नवी मालिका ‘या’ मालिकेचा रिमेक?
तसेच तिसऱ्या प्रेक्षकाने लिहीलं, “कलर्स मराठीचा जाहीर निषेध. शंकर महाराजांची मालिका बंद करून समस्त भक्तांचा अपमान केला आहे. फक्त टीआरपीसाठी मालिका बंद केली, सर्व भक्तांनी कलर्स मराठी वाहिनीचा बहिष्कार करावा.”