छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. हास्यजत्रेतील हास्यवीर विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. हास्यजत्रेमुळे अभिनेता समीर चौघुलेंच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. अभिनय व विनोदाचं अचूक टायमिंग साधत चौघुले प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात. समीर चौघुले सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच समीर यांनी सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या यूट्यूबवरील पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीदरम्यान समीर यांनी त्यांच्या मनोरंजन क्षेत्रातील प्रवासाबद्दल, हास्यजत्रेमुळे मिळालेल्या लोकप्रियतेबद्दल आणि रसिकांच्या प्रेमाबद्दल भाष्य केलं. याबरोबरच इतरही बऱ्याच विषयांवर समीर चौघुले यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. याच कार्यक्रमात १९९९ सालच्या संतोष पवार यांच्या ‘यदा कदाचित’ या नाटकाची आठवण निघाली.

आणखी वाचा : गॉसिप, नकारात्मक गोष्टींशी झुंज देणाऱ्या बाबाची कहाणी; घटस्फोटानंतर सलील कुलकर्णींनी ‘असा’ केलेला दोन मुलांचा सांभाळ

‘यदा कदाचित’ हे नाटक प्रचंड गाजलं, प्रेक्षकांनी ते अक्षरशः डोक्यावर घेतलं, पण एवढं होऊनसुद्धा त्यातील कोणत्याही कलाकाराला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नसल्याची खंत समीर यांनी ‘मित्र म्हणे’च्या या मुलाखतीमध्ये व्यक्त करून दाखवली. त्याविषयी बोलताना समीर म्हणाले, “त्या नाटकाचे मी ३००० प्रयोग केले, ते नाटक आज आलं असतं तर आम्हाला कसली ओळख मिळाली असती, पण त्याकाळी सोशल मीडिया नसल्यामुळे ती लोकप्रियता आम्हाला मिळाली नाही. संतोष पवार हा माझा अत्यंत जवळचा मित्र आहे, आम्ही एकत्र काम केलं आहे त्यामुळे ते नाटक उभं राहिलं आणि आम्ही सगळ्यांनीच हाऊफुल्लचा बोर्ड बाहेर लागण्याचा आनंद, ते सुख त्या नाटकादरम्यान अनुभवलं.”

पुढे समीर म्हणाले, “आपल्या नाटकाला निळू फुले, विक्रम गोखले, श्रीराम लागू, इला भाटे, दीपिक प्रभावळकर, चंद्रकांत गोखले यांच्यासारखी दिग्गज मंडळी येऊन आमचं नाटक पहात होती आणि आमचं कौतुक करत होती हा अनुभवच फार ग्रेट होता. पण कलाकार म्हणून ओळख न मिळाल्याचं वाईट वाटायचं. आम्ही जेव्हा प्रयोग पूर्ण करून ट्रेनने प्रवास करायचो तेव्हा आजूबाजूची लोक आमच्याबद्दलच गप्पा मारताना आम्ही पाहिलं आहे. मी नाटकात अर्जुनाची भूमिका केली होती, त्यावेळी माझ्यासमोर लोक माझ्या व्यक्तीरेखेबद्दल बोलायचे तेव्हा असं वाटायचं की त्यांना सांगावं की मीच ती भूमिका केली आहे. याचं वाईट नक्की वाटायचं.”

पुढे ‘यदा कदाचित’सारख्या नाटकामुळे काय शिकायला मिळालं याबद्दल समीर म्हणाले, “खरं सांगायचं झालं तर अशा नाटकांमुळे आमचा पाया मजबूत झाला. मला असं वाटतं की विनोद हा फार गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे याची जाणीव मला ते नाटक करताना झाली. विनोद असाच निर्माण होत नाही, त्यासाठी तुम्हाला घाम गाळावा लागतो, हा फार गंभीर प्रकारात मोडणारा व्यवसायच आहे. त्या नाटकाच्या ३००० प्रयोगांत मी विविध प्रेक्षक अनुभवले. मी यासाठी संतोष पवार यांचे आभार मानतो की त्यांच्यामुळे माझ्या प्रवासात एक असं नाटक आलं जे मला खूप काही शिकवून गेलं.” याबरोबरच हास्यजत्रेमधील सोडून गेलेल्या कलाकारांबद्दल, खासगी आयुष्याबद्दलही समीर यांनी या मुलाखतीमध्ये बऱ्याच विषयांवर भाष्य केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comedian sameer choughule speaks about superhit marathi play yada kadachit avn
Show comments