Constable Manju Fame Marathi Actor Wedding : ‘कॉन्स्टेबल मंजू’ ही मालिका ‘सन मराठी’ वाहिनीवर १८ मार्च २०२४ पासून प्रदर्शित होऊ लागली. यामध्ये वैभव कदम आणि मोनिका राठी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय या मालिकेत अभिनेता शिवराज नाळे ‘जयदीप सुर्वे’ ही भूमिका साकारत आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवराज सोशल मीडियावर एका खास कारणामुळे चर्चेत होता. अभिनेत्याने काही दिवसांपूर्वीच आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली होती. पत्नीसह प्री-वेडिंग शूटचे फोटो शेअर करत शिवराजने नव्या वर्षात ७ जानेवारीला लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता अभिनेत्याचे लग्नसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.
मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. आता यामध्ये अभिनेता शिवराज नाळेचं नाव जोडलं गेलं आहे. अभिनेत्याचा विवाहसोहळा जवळचे मित्रमंडळी व कुटुंबीयांच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडला आहे. शिवराज नाळेच्या मित्रमंडळींनी त्याच्या लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्याने लग्नमंडपात घोड्यावरुन एन्ट्री घेतल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे.
शिवराजने लोकप्रिय अभिनेत्री स्नेहा धडवईशी लग्न केलं आहे. या दोघांनी लग्नात पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं. त्याच्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर, स्नेहाने आजवर अनेक नाटकांमध्ये काम केलेलं आहे. उल्लेखनीय कामगिरीसाठी तिला अनेक पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले आहे. याशिवाय विविध कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेत्री सांभाळते. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील मालिकेत तिने तीमिषा हे पात्र साकारलं होतं. तसेच ‘सिंधुताई सपकाळ’ या मालिकेत सुद्धा स्नेहा झळकली होती.
शिवराज आणि स्नेहा यांच्या लग्नाला ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेतील बाळकृष्ण शिंदे, अजय तपकिके, विद्या सावळे, नेहा शिंदे, प्रिया करमरकर, निकिता या कलाकारांनी उपस्थिती लावली होती.
दरम्यान, या जोडप्याने सध्याच्या ट्रेंडनुसार लग्नात, शिवराज आणि स्नेहा या दोघांच्या नावाची फोड करुन लग्नात ‘शिवस्नेह’ हा टॅग वापरला होता. या जोडप्यावर सध्या सिनेविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.