अभिनेत्री दलजीत कौर गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे मोठ्या चर्चेत आहे. केनियामधील उद्योजक निखिल पटेलपासून वेगळे झाल्यानंतर अभिनेत्रीने त्याच्यावर मोठे आरोप केले होते, त्यामुळे ती सतत चर्चांचा भाग बनली आहे. आता मात्र तिने एका मुलाखतीत तिचा पूर्वाश्रमीचा पती शालीन भानोतवर भाष्य केल्याने ती चर्चेत आली आहे.

काय म्हणाली अभिनेत्री?

दलजीत कौरने नुकतीच गल्लाटा इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत, शालीन भानोतने कधी मुलगा जेडॉनला भेटण्याचा प्रयत्न केला नाही का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना तिने म्हटले, “माझे पूर्वाश्रमीच्या पतीबरोबर शालीन भानोतबरोबर एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ कोणत्याही प्रकारचे बोलणे झाले नाही. त्याने कधीच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही, त्यामुळे आमच्यात संवाद झाला नाही. त्याने वर्षभर आमच्या मुलाला भेटण्याचा प्रयत्न केला नाही. गेली नऊ वर्षे मी त्याच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या ज्या वेळी त्याने जेडॉनला भेटण्यासाठी विचारले, त्या त्या वेळी त्याला भेटू दिले आहे. कधीच त्याला भेटण्यासाठी नकार दिला नाही. जेडॉनसाठी ते चांगले आहे, म्हणून मी त्यांना आनंदाने भेटू द्यायचे. तो जेडॉनला भेटणार असेल तर मी त्याच्यापेक्षा जास्त आनंदी असायचे.”

पुढे तिने म्हटले, “त्याने एक मेसेजही केला नाही. त्याच्या मुलाचे काय चालले आहे, हे त्याने जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्याला मी निखिलला भेटण्यासाठी सुचवले होते. जेडॉनसाठी केनियाला ये, असे त्याला मी सांगितले होते, मात्र त्यावर तो फक्त हो हो म्हणाला आणि त्यानंतर गायब झाला.”

दलजीतने पुढे म्हटले की, मला अनेकदा आश्चर्य वाटते की, शालीनने एकदाही आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. केनियामध्ये माझ्याबरोबर आणि मुलाबरोबर काय झाले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्याच्याकडे माझा मोबाइल नंबर असावा, तरीदेखील त्याने प्रयत्न केला नाही.

हेही वाचा: रुपाली भोसले आणि कुशल बद्रिकेची अचानक झाली भेट, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली, “या मुलात जरा सुद्धा…”

दरम्यान, शालीन भानोत आणि दलजीत कौरने २००९ ला लग्नगाठ बांधली होती. २०१४ ला त्यांना मुलगा झाला. मात्र, २०१५ मध्ये त्यांनी एकमेकांपासून वेगळे होत घटस्फोट घेतला. त्यानंतर दलजीतने २०२३ ला एनआरआय निखिल पटेल याच्याशी लग्न केलं होतं. त्यानंतर आपल्या मुलासह ती केनियाला शिफ्ट झाली, जिथे ती निखिलच्या कुटुंबाबरोबर राहत होती. मात्र, काही महिन्यांनंतर ती भारतात परतली.