हिंदी मालिकाविश्वातील लाडक्या जोडीपैकी एक म्हणजे दीपिका कक्कर व शोएब इब्राहिम यांची जोडी. नुकतेच दोघे आई-बाबा झाले. २१ जूनला दीपिकानं एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर काही दिवसांनी अभिनेत्रीनं आपल्या युट्यूब चॅनेलवरील व्लॉगगमधून मुलाच्या नावाचा खुलासा केला होता. पण, मुलाचं नाव मुस्लिम ठेवल्यामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली आणि तो व्लॉग तिनं डिलीट केला. मात्र, तो व्लॉग डिलीट करण्यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे.
अभिनेता शोएब इब्राहिमच्या नव्या व्लॉगमधून दीपिकानं आपल्या युट्यूबवरील व्लॉग डिलीट का केला हे स्पष्ट केलं आहे. अभिनेत्री म्हणाली की, “मी माझ्या मुलाचं नाव एका वेगळ्या पद्धतीनं जाहीर करू इच्छित होते, पण त्या व्लॉगमध्ये चुकून मी मुलाचं नाव लिहिले. शोएबनं मला व्हिडीओतून मुलाचं नाव काढून टाकण्यासाठी सांगितलं होतं; परंतु व्लॉग अपलोड करताना ते मी विसरूनच गेले, त्यामुळे तो व्लॉग डिलीट केला.”
हेही वाचा – Bigg Boss OTT 2: “नरकातून बाहेर आलो”, ‘या’ सदस्यानं बिग ओटीटीच्या घरातला सांगितला भयानक अनुभव
यावर पुढे शोएब म्हणाला की, “दीपिकाच्या व्लॉगमधून आमच्या मुलाच्या नावाची हिंट सतत दिली जात होती. मी तिला व्हिडीओतून ज्या, ज्या ठिकाणी नावाची हिंट दिली जात होती, ते एडिट करून तो भाग काढायला सांगितला होता, पण तसं झालं नाही. त्यामुळे अखेर तो पूर्ण व्हिडीओ डिलीट करायला लागला. आता आम्ही सगळे जण तुम्हाला सांगतो की, आमच्या बाळाचं नाव रुहान ठेवण्यात आलं आहे.”
शोएबच्या या व्हिडीओमुळे दीपिकानं तो व्लॉग ट्रोलिंगमुळे डिलीट न केल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, दीपिकाची डिलिव्हरी प्री-मॅच्युअर झाल्यामुळे व बाळ अशक्त असल्यामुळे त्याला एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. तब्बल १९ दिवस बाळ एनआयसीयूमध्ये राहिल्यानंतर दीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.