Ajit Pawar Post for Suraj Chavan: ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले मोठ्या जल्लोषात पार पडला. बारामतीजवळच्या मोढवे गावातील रीलस्टार सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता ठरला. सूरजने ७० दिवसांच्या प्रवासात इतर सर्व स्पर्धकांना मागे टाकत या शोची ट्रॉफी जिंकली. त्याने हा शो जिंकल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्याचं कौतुक करणारी पोस्ट केली आहे.
सूरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी ५’ जिंकल्यावर चाहते, सेलिब्रिटी आणि राजकीय नेतेमंडळी त्याचं अभिनंदन करत आहेत. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या सूरजचं सोशल मीडिया पोस्टद्वारे कौतुक केलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीदेखील सूरज चव्हाण विजेता झाल्यावर पोस्ट केली आहे. यात त्यांनी सूरजच्या संघर्षाचा उल्लेख केला आहे.
हेही वाचा – सूरज चव्हाणने Bigg Boss Marathi 5 जिंकल्यावर प्रवीण तरडेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…
अजित पवारांची पोस्ट
“आमच्या बारामतीचा सुपुत्र सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत सूरजनं हे यशोशिखर गाठलं आहे. सूरज आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्याच्या यशामुळे बारामतीचाच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे. सूरजला उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!” अशी पोस्ट अजित पवारांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांनीदेखील सूरजचं कौतुक केलं. प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या सूरजने एवढा मोठा शो जिंकणं कौतुकास्पद असल्याचं सूनेत्रा पवार म्हणाल्या होत्या. सूरज हा बारामतीजवळच्या मोढवे गावातील आहे. तो शोचा विजेता ठरल्यानंतर त्याच्या गावात जल्लोषाचं वातावरण आहे.
हेही वाचा – Bigg Boss Marathi 5 चा विजेता सूरज चव्हाणसाठी सुप्रिया सुळेंची पोस्ट, म्हणाल्या, “आपल्या बारामतीचा…”
बारामतीचा रीलस्टार सूरज चव्हाण बिग बॉसमध्ये जिंकलेल्या रकमेचं काय करणार हे त्यानेच सांगितलं आहे. “मला घर बांधायचंय त्यामुळे ही रक्कम मी घर बांधण्यासाठी वापरणार आहे. त्या घराला म्हणजेच घर बांधून झाल्यावर मी माझ्या घराला ‘बिग बॉस’चं नाव देणार आहे,” असं सूरज चव्हाणने सांगितलं.