‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री राधिका देशपांडेने मालिका व चित्रपटांत काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सध्या राधिका तिच्या ‘सियावर रामचंद्र की जय’ या बालनाट्याच्या प्रयोगांमध्ये व्यग्र आहे. राधिकाने या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. नुकतंच या नाटकाचे नागपुरात प्रयोग पार पडले.
‘सियावर रामचंद्र की जय’च्या नागपुरातील प्रयागोदरम्यान या बालनाट्यातील कलाकारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याबाबत देवेंद्र फडणवीसांनी एक ट्वीट केलं आहे. फडणवीसांनी या बालनाट्याच्या प्रयोगातील एक व्हिडीओ त्यांच्या ट्वीटरवरुन शेअर केला आहे. “सियावर रामचंद्र की जय! नागपूर येथील ७५ बालकलाकार एकत्र येऊन ‘सियावर रामचंद्र की जय’ हे हिंदी महानाट्य सादर करत आहेत, याचा आनंद आहे. या महानाट्यातील बालकलाकार, दिग्दर्शक यांनी माझी परवा भेट घेतली. बालमित्रांना भेटून, त्यांचा उत्साह बघून मन प्रसन्न झाले. त्यांचे अभिनंदन केले आणि खूप खूप शुभेच्छा दिल्या”, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा>> ‘रामायण’ चित्रपटात रावणाची भूमिका साकारण्याबाबत ‘केजीएफ’ फेम यशने सोडलं मौन, म्हणाला, “चित्रपटातून पैसे…”
देवेंद्र फडणवीसांचं हे ट्वीट राधिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करत पोस्ट लिहिली आहे. “धन्यवाद. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो. तुम्हाला भेटून आणखी ऊर्जा मिळाली. मुलांचा उत्साह द्विगुणित झाला,” असं म्हणत राधिकाने देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहेत.
राधिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती समाजातील घडामोडींबाबत व्यक्त होताना दिसते. राधिकाने काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाबाबत केलेली पोस्ट चर्चेत होती.