देवदत्त नागे यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण ते खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आले ते ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘जय मल्हार’ या मालिकेमुळे. या मालिकेत ते खंडोबांच्या भूमिकेत होते. या भूमिकेमुळे ते महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले आणि त्यांचा राज्यभरात मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. तर आता ते मराठीसह हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले.

देवदत्त नागेंना इंडस्ट्रीत नवीन असताना बराच संघर्ष करावा लागला होता. याबाबत त्यांनी नुकतंच एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. ‘अमोल परचुरे’ यांच्याशी संवाद साधताना त्यांनी या संघर्षाबद्दल सांगितलं. ‘इंडस्ट्रीत नवीन असताना तू एक्स्ट्रा म्हणूनही काम केलं होतंस, याबद्दल काय सांगशील?’ अशा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. उत्तर देत देवदत्त म्हणाले, “१९९७ मध्ये दुरदर्शनवर दिग्दर्शक पंकज पराशय यांच्या ‘स्वराज’ या मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं आणि यासाठी आम्हाला सांगण्यात आलं होतं की, तुम्ही शहीद आहात आणि तुम्हाला शहीद म्हणून डेडबॉडीप्रमाणे खाली झोपून राहायचं आहे. आम्ही ३०-३५ जण होतो आणि असा सीन आम्ही सलग ३ दिवस केला. त्यावेळी त्या तीन दिवसांत माझ्या डोक्यात ३ लाख विचार येऊन गेले की, मी काय करतोय. माझे चांगले दिवस कधी येतील”.

करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना पुढे देवदत्त म्हणाले, “ते तीन दिवस मला खूप काही शिकवून गेले होते. तेव्हा मी खूप लहान होतो. काही कळत नव्हतं. तेव्हाच ठरवलं होतं की मला एक दिवस इथे राज्य करायचं आहे. आणि नंतर ‘जयमल्हार’, ‘देवयानी’, ‘उदे गं अंबे’ या मालिकांच्या शूटिंगसाठी पुन्हा तिथेच जाताना समाधानी वाटायचं.”

दरम्यान, देवदत्त नागे यांनी सुरुवातीच्या काळात संघर्ष करुन इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. आता त्यांनी मराठी, हिंदीसह दाक्षिणात्य इंडस्ट्रीत स्वतःच्या अभिनयाची छाप उमटवली आहे. देवदत्त नागे यांनी मराठीमध्ये अनेक मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या. त्यांनी हिंदीत ‘तान्हाजी’, ‘आदिपुरुष’ यांसारख्या चित्रपटांमध्येही झळकले आहेत. तर नुकतेच ते ‘रॉबिनहूड’ या दाक्षिणात्य चित्रपटात झळकले होते.