Devmanus Fame Actor Kiran Gaikwad : मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदे, रीलस्टार सोनाली गुरव व ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिषेक गावकर, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेता निखिल राजेशिर्के या कलाकारांपाठोपाठ आता आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाला आहे. हा अभिनेता म्हणजे ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेला किरण गायकवाड. किरणने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती आता अभिनेता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
‘लागिरं झालं जी’, ‘देवमाणूस’ या मालिकांमुळे अभिनेता किरण गायकवाड ( Kiran Gaikwad ) घराघरांत लोकप्रिय झाला. ‘लागिरं झालं जी’ मालिकेत त्याने साकारलेली हर्षवर्धन या खलनायकाची भूमिका घराघरांत लोकप्रिय झाली होती. तर ‘देवमाणूस’ मालिकेच्या दोन्ही भागांमुळे घराघरांत किरणने आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप उमटवली. छोटा पडदा गाजवल्यावर आता किरण वैयक्तिक आयुष्यात एका नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे. काही दिवसांपूर्वीच होणाऱ्या पत्नीबरोबर रोमँटिक फोटो शेअर करत किरणने आता लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं.
सध्या किरण आणि त्याच्या होणाऱ्या बायकोच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झालेली आहे. अभिनेत्याच्या होणाऱ्या पत्नीबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात…
किरणची होणारी पत्नी आहे तरी कोण?
किरण गायकवाड ( Kiran Gaikwad ) अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी लग्नगाठ बांधणार आहे. अभिनेत्याची होणारी बायको सुद्धा अभिनेत्रीच आहे. किरण आणि वैष्णवी कल्याणकर यांनी एकत्र ‘देवमाणूस २’ या मालिकेत काम केलं होतं. सध्या वैष्णवी ‘तिकळी’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
मेहंदी सोहळ्याला सुरुवात
वैष्णवी आणि किरण यांच्या मेहंदी सोहळ्याला सुरुवात झाली असून याची खास झलक अभिनेत्रीच्या मेहंदी आर्टिस्टने सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये वैष्णवीच्या हातावर किरणच्या नावाची मेहंदी रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, किरण ( Kiran Gaikwad ) आणि वैष्णवी यांनी प्रेमाची जाहीर कबुली दिल्यापासून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मनोरंजन विश्वातील असंख्य कलाकारांनी किरणला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.