Kiran Gaikwad And Vaishnavi Kalyankar Wedding: ‘लागिरं झालं जी’ आणि ‘देवमाणूस’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड १४ डिसेंबरला लग्नबंधनात अडकला. अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी किरणने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. किरण-वैष्णवीचं मोठ्या थाटामाटात सावंतवाडीमध्ये लग्नसोहळा पार पडला. सध्या या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसंच आता किरण-वैष्णवीच्या लग्नाचा पूर्ण व्हिडीओ समोर आला आहे.
अभिनेता किरण गायकवाड आता सावंतवाडीचा जावई झाला आहे. बऱ्याच काळापासून किरणने वैष्णवीबरोबरचं नातं गुपित ठेवलं होतं. पण, २९ नोव्हेंबरला अभिनेत्याने प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर काही दिवसांत किरणने लग्नाची तारीख जाहीर केली. १४ डिसेंबरला किरण-वैष्णवी लग्नबंधनात अडकले. मेहंदी, साखरपुडा, हळद, संगीत, सप्तपदी आणि रिसेप्शन असा समारंभपूर्वक लग्नसोहळा दोघांचा पाहायला मिळाला.
लग्नासाठी किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकरने खास मराठमोळा पारंपारिक लूक केला होता. अभिनेत्याने पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि त्यावर फेटा बांधला होता. तर वैष्णवी कल्याणकरने गडद जांभळ्या रंगाची नऊवारी नेसली होती. ज्यावर तिने मोजके दागिने परिधान केले होते. त्यामुळे दोघं फारच सुंदर दिसत होते. किरण-वैष्णवीच्या लग्नाला अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील अभिनेता नितीश चव्हाण, अमरनाथ खराडे, निखिल चव्हाण, सुमीत पुसावळे, महेश जाधव, राहूल मगदुम आणि पूर्वा शिंदे यांनी खास हजेरी लावली होती.
लग्नाच्या पूर्ण व्हिडीओमध्ये किरण म्हणाला, “वैष्णवी माझ्या आयुष्यात आली आणि वेगळी कलाटणी मिळाली. जरा माझं विस्तारलेलं आयुष्य होतं. त्यामुळे मला असं वाटतं, समेटून घेणारी आणि एका चौकात आणणारी अशी वैष्णवी आहे. मी तिला पहिल्यांदा आय लव्ह यू वगैरे नाही म्हणालो. तिला थेट म्हटलं, लग्न करूया.”
दरम्यान, किरण गायकवाड आणि वैष्णवीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेता ‘लागिरं झालं जी’, ‘देवमाणूस’ मालिकेनंतर वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर वैष्णवी ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तिकळी’ नावाच्या मालिकेत दिसत आहे. या मालिकेत तिने नली ही प्रमुख भूमिका साकारली आहे.