‘लागिरं झालं जी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाडने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत त्याने साकारलेल्या भैय्यासाहेब अजूनही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. ही व्यक्तिरेखा किरणने उत्तमरित्या साकारली होती. त्यानंतर किरण ‘देवमाणूस’ या मालिकेमुळे अधिक प्रसिद्धीच्या झोतात आला. या मालिकेतील त्याच्या डॉ. अजितकुमार देव भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. जेवढं या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेम केलं, तितकाच तिरस्कार देखील केला. विशेष म्हणजे ‘देवमाणूस’ मालिकेचे दोन भाग पाहायला मिळाले. आता लवकरच किरण गायकवाडची नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याबाबत किरणने स्वतः खुलासा केला आहे.
किरण गायकवाडचं १४ डिसेंबर २०२४ रोजी मोठ्या थाटामाटात लग्न झालं. किरणने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे सध्या तो वैष्णवीबरोबर वैवाहिक आयुष्य एन्जॉय करताना पाहायला मिळत आहे. तसंच दुसऱ्या बाजूला त्याने कामाला सुरुवात केली आहे.
‘लोकमत फिल्मी’शी संवाद साधताना किरण गायकवाड म्हणाला की, प्रेक्षकांना मी सांगून टाकतो या नवीन वर्षात मी पुन्हा छोट्या पडद्यावर येतोय. साधारण, पुढच्या दोन-अडीच महिन्यात टीझर येईल. पुन्हा एकदा तेच वातावरण बघायला मिळेल. मी कशाबद्दल बोलतोय हे तुम्हाला कळेलच.
पुढे किरण गायकवाड म्हणाला, “माझा एक सिनेमा झाला. जो मी स्वतः दिग्दर्शित केला आहे आणि लिहिला आहे. अजून एक सिनेमा लिहायला घेतला आहे. त्याची सध्या मिटिंग सुरू आहे. यावर्षी दोन सिनेमे जे केले आहेत, ते प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. २०२५ हे धमाकेदार असणार आहे. माझं आयुष्य वेगळ्या टर्निंग पॉइंटने सुरू झालंय.”
दरम्यान, किरण गायकवाडने ‘देवमाणूस’ मालिकेनंतर काही चित्रपट केले. त्यापैकी ‘चौक’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं विशेष कौतुक करण्यात आलं. देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित ‘चौक’ चित्रपटात किरण गायकवाडसह अभिनेता शुभंकर एकबोटे, प्रवीण तरडे, उमेंद्र लिमये, अक्षय टंकसाळे, संस्कृती बाळगुडे असे बरेच कलाकार झळकले होते. त्यानंतर किरण ‘आंबट शौकिन’, ‘नाद’ या चित्रपटाने पाहायला मिळाला.