‘देवमाणूस’, ‘रानबाजार’ या कलाकृतींमुळे अभिनेत्री माधुरी पवार घराघरांत लोकप्रिय झाली. ती उत्तम नृत्यांगणा देखील आहे. सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीत काम करताना माधुरीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. मेहनतीच्या जोरावर आज अभिनेत्रीने मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतीच तिने ‘आरपार’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी आपलं करिअर, ‘रानबाजार’मधल्या भूमिकेचा अनुभव तिने सांगितला.
अलीकडच्या जगात मुली सुरक्षित नाहीत, याबद्दलचं मत विचारलं असता अभिनेत्री माधुरी पवार म्हणाली, “प्रथमत: एखादी स्त्री स्वत:ला ताकदवार समजते की, ती दुसऱ्याच्या नजरेतून बघून स्वत:ला कमकुवत समजते हे प्रत्येक स्त्रीवर अवलंबून असतं. समाजात महिलांना अनेक अशा घटनांना सामोरं जावं लागतं, अनेकदा हतबलेतेमुळे महिला प्रतिकार करु शकत नाही. पण, माझ्या बाबतीत सांगायचं झालं, तर मला लहानपासून असं वाटतं की, मी त्या मानाने सुरक्षित वाढले. माझ्या मनात कधीच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली नाही. नटराजाची कृपेने मला असं कधीच नाही वाटलं.”
माधुरी पवार पुढे म्हणाली, “ती चंडिका तुमच्या मनात नेहमी जागी राहिली पाहिजे. ती चंडिका तुम्ही जिवंत ठेवाल, तर समोरच्या राक्षसाला नेहमीच माराल. तिथे आपण मुळमुळीत राहिलं नाही पाहिजे. तर, कधीतरी प्रकर्षाने लढण्यापेक्षा बुद्धीने पण लढता आलं पाहिजे. याचं एक उदाहरण सांगते. तेव्हा मी अगदी शाळेत नववी किंवा दहावीमध्ये असेन.”
“मी शाळेत असताना अनेक स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे. आपल्याच आजूबाजूला काही लोक असतात जे आपल्याला वाटतात अरे हा आपला मित्र आहे, हा आपला सखा आहे पण, त्याच्या आतमधला माणूस आपल्याला दिसत नसतो. कोल्हापूरच्या पुढे कागल म्हणून एक गाव आहे. तिथे माझी एक स्पर्धा होती. त्यावेळी XYZ एक व्यक्ती आहे. आता मला कोणाचं नाव घ्यायचं नाहीये. तो सुद्धा त्या स्पर्धेत होता. त्याने सांगितलं आम्ही स्पर्धेसाठी पुढे जातो वगैरे मी सुद्धा तयार झाले. त्यात तो ओळखीचा असल्याने मला त्याच्याबरोबर जायला सांगितलं. मी तेव्हा टॉम बॉयिश असल्याने मलाही त्याच्याबरोबर जाताना काही वाटलं नाही. आमचा ग्रुप मागून येणार होता. त्याने फोर्स करुन सांगितलं, आपण निघू…म्हणजे लवकर पोहोचू वगैरे…मी पण म्हटलं ठिके.”
“स्पर्धेसाठी पोहोचल्यावर तिथे एक आवरण्यासाठी रुम देतात. मेकअपची तयारी तिथेच केली जाते…आता मुलगी असल्याने मला काही गोष्टी आधीच जाणवल्या. तो सिक्स सेन्स देवाने आधीच दिलेला आहे. म्हणूनच ती गोष्ट मी अगदी सहज हँडल केली. ती व्यक्ती माझ्या जवळ येऊन बसली आणि त्याने माझ्या खांद्यावर हात टाकला. मी त्याला अगदी छान भाषेत सांगितलं…’अरे हा हात टाकल्यावर मला खूप छान वाटतंय. असं वाटतंय कोणीतरी चांगला मनुष्य माझ्याबरोबर आहे. मला भारी वाटतं तू माझा मित्र आहेस’ असं मी त्याला बोलले. त्याच्या मनात आलं अरे… आपण हिच्याबद्दल खूप वाईट विचार करतोय. पण, ही कशी चांगला विचार करतेय. जर ती परिस्थिती मला हाताळता आली नसती, तर कदाचित तेव्हा काहीही घडलं असतं आणि मला घरीही काही सांगता आलं नसतं, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी ती गोष्ट विसरू शकले नसते. एकंदर सांगायची गोष्ट ही की, तुमच्यात तेवढी समयसूचकता सुद्धा असली पाहिजे. ती समयसूचकता तुम्हाला कोणत्याही वयात येऊ शकते.” असं माधुरी पवारने सांगितलं.