मराठी मालिकांमधील काही अशा मालिका असतात की, ज्या प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. त्यातलीच एक मालिका म्हणजे ‘देवमाणूस’. ‘देवमाणूस’ आणि मग ‘देवमाणूस-२’ या मालिकांनी प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. त्यात खलनायकाचं पात्र साकारत किरण गायकवाडनं प्रसिद्धी मिळवली. तर अनेक कलाकारांनी आपली कामगिरी बजावत लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं.
झी मराठी वाहिनीवरील या मालिकेला खूप मोठ्या प्रमाणात टीआरपी मिळाला होता. ‘देवमाणूस’ मालिकेत अनेक नवनवीन कलाकारांची एन्ट्री झाली होती. त्यातलीच एक लक्षात राहणारी भूमिका अपर्णाची होती. अनेक स्त्रियांसारखंच अपर्णालाही फसवून डॉक्टर तिचा शेवट करतो. ऐश्वर्या नागेश हिनं अपर्णाची भूमिका साकारली होती. आता याच अभिनेत्रीनं अभिनय क्षेत्रातून विश्रांती घेत न्यूज अँकरिंगचं क्षेत्र निवडलं आहे. अभिनेत्री झाल्यानंतर न्यूज अँकरिंगमध्ये इंटरेस्ट दाखवणारी अभिनेत्री ऐश्वर्या नागेश आता थेट आयपीएलसाठी अँकरिंग करताना दिसत आहे.
कॉलेजमध्ये असताना ऐश्वर्यानं सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याशिवाय तिनं नाटकातही काम केलं होतं. देवमाणूस या मालिकेमुळे तिला ओळख मिळाली. नंतर तिनं न्यूज चॅनेलसाठी अँकरिंगचं काम केलं.
हेही वाचा… आलिया भट्टने ‘क्रू’ चित्रपटातील अभिनेत्रींचे केले कौतुक; म्हणाली…
आता ऐश्वर्याला प्रथमच टाटा आयपीएलच्या १७ व्या सीजनमध्ये अँकरिंग करण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दलची पोस्ट तिनं तिच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केली आहे. “२६ मार्च २०२४ आयपीएलसाठी अँकरिंग करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. मनामध्ये भीती, दडपण व उत्साह घेऊन मी स्टुडिओमध्ये पोहोचले. या शोमध्ये गेस्ट होते अतुल बेदाडे आणि सिद्धेश लाड. अनेक नवीन गोष्टी मला इथे पाहायला मिळाल्या शिकायला मिळाल्या अनेक तांत्रिक गोष्टी समजून घेता आल्या. आता मी खूप उत्सुक आहे माझ्या येणाऱ्या शूटसाठी.”
हेही वाचा… ‘12th fail’ फेम विक्रांत मेस्सीने लाडक्या लेकासाठी काढला खास टॅटू; फोटो शेअर करत म्हणाला…
बऱ्याच कलाकारांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याआधी आपलं नशीब पत्रकारिता आणि रेडिओ क्षेत्रात आजमावलं आहे. अभिनेता अभिजीत खांडकेकर हा सुरुवातीला रेडिओ जॉकी म्हणून काम करीत होता. यादरम्यान त्याची कलाकारांबरोबर ओळख झाली आणि त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तर, स्मिता तळवलकर, स्मिता पाटील यादेखील सुरुवातीच्या काळात न्यूज रीडर म्हणून काम करीत होत्या.