‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लागिरं झालं जी’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाडने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत त्याने साकारलेल्या भैय्यासाहेब (हर्षवर्धन युवराज देशमुख) अजूनही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. ही व्यतिरेखा किरणने उत्तमरित्या साकारली होती.
त्यानंतर किरण अधिक प्रसिद्धीच्या झोतात आला ‘देवमाणूस’ या मालिकेमुळे. या मालिकेतील त्याच्या डॉ. अजितकुमार देव भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. जेवढं या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेम केलं तितकाच तिरस्कार देखील केला. महत्त्वाचं म्हणजे या मालिकेचे दोन भाग आले. आता या मालिकेनंतर किरण गायकवाडची एका लोकप्रिय मालिकेत दमदार एन्ट्री होणार आहे; ज्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीचा बायकोबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “अरेरे बिचारा…”
‘देवमाणूस २’ मालिकेनंतर किरण गायकवाड अनेक अल्बम साँग आणि चित्रपटांमध्ये पाहायला मिळाला. पण कुठल्याही मालिकेत झळकला नाही. मात्र आता ‘सन मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘कॉन्स्टेबल मंजू’मध्ये किरण गायकवाडची एन्ट्री होणार आहे. याचा व्हिडीओ ‘सन मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेतील सत्या – मंजूच्या लग्नासाठी अभिनेता किरण गायकवाड खास हजेरी लावणार आहे. त्यामुळे बऱ्याच काळानंतर किरणला मालिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
हेही वाचा – “दाताडी” म्हणणाऱ्याला गायिका जुईली जोगळेकरने सुनावलं, म्हणाली, “स्वतःचं थोबाड…”
दरम्यान, किरण गायकवाडच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘देवमाणूस’ मालिकेनंतर त्याने काही चित्रपट केले. त्यापैकी ‘चौक’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं विशेष कौतुक करण्यात आलं. देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित ‘चौक’ चित्रपटात किरण गायकवाडसह अभिनेता शुभंकर एकबोटे, प्रवीण तरडे, उमेंद्र लिमये, अक्षय टंकसाळे, संस्कृती बाळगुडे असे बरेच कलाकार झळकले होते. किरणच्या आगामी चित्रपटाबाबत बोलायचं झालं तर, त्याचा ‘आंबट शौकिन’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात किरणसह अभिनेत्री पूजा सावंत, प्रार्थना बेहेरे, अक्षय टंकसाळे पाहायला मिळणार आहेत. गेल्या वर्षी या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला होता.
© IE Online Media Services (P) Ltd