देवोलीना भट्टाचार्जी गेल्या वर्षी लग्नाच्या बेडीत अडकली. तिने तिचा बॉयफ्रेंड शाहनवाज शेखशी लग्न केलं. धर्माने मुस्लीम असलेल्या शाहनवाजशी विवाहबद्ध झाल्याने देवोलीनाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. अजूनही अनेकदा तिला यावरून ट्रोल केलं जातं. आता एका नेटकऱ्याच्या ट्वीटला तिने सडेतोड उत्तर दिलं आहे.
डॉक्टर प्राची साध्वी यांनी हरिद्वारमध्ये मुलींना मोफत ‘द केरला स्टोरी’ चित्रपट दाखवला गेल्याचं ट्वीट करत सांगितलं. त्यावर एकाने देवोलीनाचं नाव घेत लिहिलं, “देवोलीनाला बोलावलं होतं का? तिने या चित्रपटामध्ये काम केलं आहे, असं विकिपीडिया म्हणतं. हिच्या पतीचे नाव शाहनवाज शेख आहे. कदाचित तुम्हाला माहीत नसेल… लव्ह जिहादची ऐशी की तैशी.” नेटकऱ्याच्या या ट्वीटवर देवोलीनाने त्याची चांगलीच शाळा घेतली.
नेटकऱ्याच्या या ट्वीटला उत्तर देत तिने लिहिलं, “मला बोलवायची त्यांना गरज भासली नाही. ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट मी आणि माझा नवरा आधीच पाहून आलो आहोत. आम्हा दोघांनाही हा चित्रपट आवडला. ‘खरा भारतीय मुस्लीम’ हे नाव ऐकलं आहे का? माझा नवरा त्यातलाच एक आहे, जो चूकला चूक म्हणण्याची ताकद आणि हिम्मत बाळगतो.” देवोलीनाचं हे ट्वीट आता चांगलंच चर्चेत आलं आहे. या ट्वीटवर कमेंट करत आता नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान, देवोलीना अनेकदा समाजातील तिला खटकणाऱ्या किंवा आवडणाऱ्या गोष्टींबद्दल ती स्पष्टपणे मत मांडताना दिसते. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या नवऱ्याबरोबर ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट पाहिला. तिचा नवरा शाहनवाजला त्यात काही आक्षेपार्ह वाटलं नाही, असं ट्वीट तिने केलं होतं. तर त्यानंतर आता ती या नव्या ट्वीटमुळे चर्चेत आली आहे.