अभिनेत्री देवोलीना भट्टचार्जीने १४ डिसेंबरला लग्नगाठ बांधली. लोणावळ्यात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत तिने बॉयफ्रेंड शाहनवाज शेखशी लग्न केलं. देवोलीना आणि शाहनवाज मागच्या दोन-तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. देवोलीनाने ती रिलेशनशिपमध्ये असल्याचं अनेकदा सांगितलं होतं, पण तिच्या बॉयफ्रेंडबद्दल कुणालाच माहीत नव्हतं. दरम्यान, लग्नानंतर तिने पतीबरोबरचे काही फोटो शेअर करत त्याची ओळख चाहत्यांना करून दिली होती. त्याचं नाव शाहनवाज शेख असून तो जिम ट्रेनर आहे.
‘गोपी बहू’ने मुस्लीम तरुणाशी केलंय लग्न, जाणून घ्या काय करतो देवोलीनाचा पती
देवोलीनाने लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या. तर, तिचा पती मुस्लीम आहे, हे समजल्यानंतर काहींनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अशातच काही जणांनी तिने मुस्लीम तरुणाशी लग्न केल्यानंतर श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण करून दिली. अशाच एका युजरच्या कमेंटला देवोलीनाने प्रत्युत्तर दिलं आहे.
“माझ्या आयुष्यातील…” लग्नानंतर ‘साथिया’ फेम देवोलीनाची पहिली पोस्ट; पतीबरोबरचे फोटो केले शेअर
देवोलीनाने लग्नाचे फोटो ट्विटरवर शेअर केले होते. या फोटोवर एका युजरने ‘रेस्ट इन फ्रिज’ अशी कमेंट केली. या कमेंटवर देवोलीना संतापली आणि तिने युजरला प्रत्युत्तर दिलं. तिने रिप्लायमध्ये लिहिलं, ‘तुम्हालाच तुमची होणारी पत्नी आणि मुलं फ्रिजमध्ये टाकणार नाहीत, याची काळजी घ्या. मला खात्री आहे की तुम्हाला ते प्रकरण आठवतच असेल, कारण ही बातमी जास्त जुनी नाही. त्यामुळे तुम्हालाही ऑल द बेस्ट.’ दरम्यान, देवोलीनाच्या या पोस्टवर विविधांगी प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी अभिनेत्रीला तिच्या प्रतिक्रियेबद्दल पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात उघडकीस आलेल्या श्रद्धा वालकर प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. त्यानंतर श्रद्धाप्रमाणेच एका व्यक्तीच्या हत्येची बातमीही समोर आली होती. हा खून त्याच्या पत्नी आणि मुलानेच केला होता. देवोलिनाने त्याच प्रकरणाचा दाखला देत युजरला उत्तर दिलंय.