Bigg Boss Marathi 5 च्या पाचव्या पर्वात सहभागी झालेल्या स्पर्धकांची विविध कारणांमुळे चर्चा सुरू असते. या पर्वात अनेक सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर सहभागी झाले आहेत. या सगळ्यांत धनंजय पोवार आपल्या वेगळ्या अंदाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असतो. आता प्रसिद्ध दिग्दर्शक व कलर्स मराठी वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी धनंजय पोवारबद्दल केलेले वक्तव्य चर्चेत आहे.

काय म्हणाले केदार शिंदे?

केदार शिंदे यांनी अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला नुकतीच मुलाखत दिली. त्यावेळी धनंजय पोवारबद्दल बोलताना त्यांनी म्हटले, “मला त्यांच्या पंच लाइन्स खूप आवडतात. त्याच्याकडे विनोदबुद्धी आहे. एक तर तो कौटुंबिक माणूस आहे. डीपीसारखा माणूस डान्स वगैरे करतो, तर मला तो एकदम ‘सत्या’ या चित्रपटातील भिकू म्हात्रेच दिसतो. बऱ्याच वेळा मला असं वाटतं की, मनोज बाजपेयी ‘सत्या’मध्ये जरा जाडा असता, तर सेम त्याच्यासारखा दिसला असता”,असे म्हणत केदार शिंदे यांनी धनंजय पोवारचे वर्णन केले आहे.

त्याबरोबरच पंढरीनाथ कांबळेबद्दल बोलताना त्यांनी म्हटले, “आपण सगळे जणच कोशात असतो. त्या कोशातून बाहेर येणं फार महत्त्वाचं आहे. बाकीचे जे हाय होल्टेज लोक आहेत, त्यांना माहितेय की, खेळात काय करायचंय ते. पॅडी पहिल्यांदा असं काहीतरी करण्यासाठी गेला असेल. उद्या मी गेलो, तर माझीही अवस्था तीच होईल. मलापण वेळ लागेल बाहेर पडण्यासाठी आणि माझ्या सवयी मोडण्यासाठी. पॅडी त्याचा मूळ स्वभाव दाखवतोय. जसा तो आहे, तसाच तो दिसतोय. अडीच वाजता जाऊन मी येतोय असं लिहिणं, हे त्याच्यातील लालबाग परळचे जे किडे होते ना, ते आहेत हे आणि दुसऱ्या दिवशी चेहरा शांत करून कुणी लिहिलं माहीत नाही. हे जे आहे, तो तोच पॅडी आहे.”

हेही वाचा: “या सीझनमध्ये रितेश स्पर्धकांना बोलण्याची संधी देतो…”, केदार शिंदे म्हणाले, “नुसतंच त्यांच्यावर ओरडण्यापेक्षा…”

याबरोबरच केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणबद्दल, महेश मांजरेकरांना होस्ट म्हणून का घेतलं नाही, रितेश देशमुखची होस्टिंग अशा अनेक गोष्टींबद्दल वक्तव्य केले आहे.

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरात अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत. वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे घरात आलेला संग्राम चौगुले वैद्यकीय कारणांमुळे घराबाहेर पडला आहे. त्याबरोबरच कमी मते मिळाल्यामुळे अरबाजला घराबाहेर जावे लागले आहे. तो जाताना निक्कीला रडू कोसळल्याचे पाहायला मिळाले. आता येणाऱ्या काळात बिग बॉसच्या घरात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.