सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवार (Dhananjay Powar) आणि अभिनेता पंढरीनाथ कांबळे बिग बॉस मराठी ५ नंतर पुन्हा एकदा एकत्र आल्याचे पाहायला मिळाले आहे. धनंजय पोवारने सोशल मीडियावर पंढरीनाथ कांबळेबरोबर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमुळे सध्या या दोघांची चर्चा होताना दिसत आहे.
धनंजय पोवारने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पंढरीनाथ कांबळेबरोबरचा आहे. त्यामध्ये दोघेही मोठ्याने हसत आहेत, असे दिसते. हा फोटो शेअर करताना धनंजय पोवारने, “कॅप्शन तुम्हीच सांगा”, असे म्हटले आहे. त्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले नेटकरी?
धनंजय पोवारच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे. “एवढं जोरात हसताय म्हणजे नक्कीच घनश्यामवर चर्चा असणार”, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले, “वाघांना कॅप्शनची गरज नाही.” आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “निक्की खूप रडली म्हणून हसत असणार.” एका चाहत्याने बिग बॉसमधील दोघांच्या खेळाचे कौतुक करीत लिहिले, “डर्टी गेम न खेळलेले दोन महारथी.”
“ही दोस्ती तुटायची नाही”, “बिग बॉस मराठीमधील सर्वात शक्तिशाली माणसं”, “पिकनिक स्पॉटचे संस्थापक आणि चेअरमन”, “माणुसकीचे जिवंत उदाहरण”, अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
‘बिग बॉस मराठी ५’ मध्ये या दोघांचीही खूप चर्चा झाली. त्यांच्या अनोख्या अंदाजाने या दोघांनीही प्रेक्षकांची मने जिंकली होती. जेव्हा घरात ग्रुप ए आणि ग्रुप बी, असे दोन गट पडले, तेव्हा ते एका गटात म्हणजेच ग्रुप बीमधून खेळत होते. मात्र, काही काळानंतर धनंजय पोवारने ग्रुपमधून बाजूला होत, स्वतंत्रपणे खेळण्याचा निर्णय घेतला होता.
धनंजय पोवारला चौथ्या स्थानावरून घरातून बाहेर पडावे लागले; मात्र आपल्या खेळाने आणि अनोख्या अंदाजाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकल्याचे पाहायला मिळाले होते. तो त्याच्या विनोदी व्हिडीओंसाठी प्रसिद्ध आहे. याआधी त्याच्या घरी बिग बॉसमधील वैभव चव्हाण आणि इरिना रूडाकोवा यांनी हजेरी लावली होती. इरिनाचे ज्या प्रकारे स्वागत त्याच्या कुटुंबियांनी केले होते, ते पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कौतुक केल्याचे पाहायला मिळाले होते.