Bigg Boss Marathi 5 व्या पर्वाने प्रेक्षकांचा नुकताच निरोप घेतला आहे. मात्र, या पर्वात सहभागी झालेल्या स्पर्धकांची मोठी चर्चा सुरू आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून आल्यानंतर या स्पर्धकांनी मुलाखती दिल्या आहेत. या मुलाखतीत त्यांनी केलेली वक्तव्ये सध्या चर्चेचा भाग बनली आहेत. आता धनंजय पोवार (Dhananjay Powar)ने वैभव चव्हाणबाबत केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
काय म्हणाला धनंजय पोवार?
धनंजय पोवारने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी बिग बॉसच्या घराबाहेर कोणत्या सदस्यांबरोबर मैत्री ठेवणार? असा प्रश्न त्याला विचारला. याचे उत्तर देताना धनंजयने म्हटले, “मी जे नातं करतो ते मनापासून करतो. समोरच्याकडून कोणत्याही पद्धतीच्या टिका-टिप्पणी माझ्यावर झाल्या असतील तरीही ते नातं माझ्याकडून तसंच राहील. मी या १७ सदस्यांपैकी कोणत्याही सदस्याबरोबर नातं ठेवणार नाही, असं बोलायला मला अजिबात आवडणार नाही. पण, ज्याला ठेवायचं नसेल त्याचा आदर मी नेहमी ठेवेन. ज्याला ठेवायचे असेल त्यांच्याबरोबर मी नेहमी राहीन. वैयक्तिकरित्या सांगतो, वैभवने माझ्यापासून दूर गेलेलं मला आवडणार नाही.”
पुढे बोलताना धनंजयने म्हटले, “जोडीच्या टास्कच्या आधीपासून मी वैभवकडे मातीतला माणूस म्हणून बघायचो, पण त्याला ते समजलं नाही. बऱ्याच गोष्टी मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, कारण महाराष्ट्राला काय हवय हे कमेंट्समधून कळत होतं. इकडच्या ग्रुपमध्ये येऊन अरबाजच्या विरुद्ध जाऊन त्याला राजा म्हणून जगण्याची संधी होती. आम्हालादेखील त्याचा आधार मिळाला असता, पण त्याला ते समजलेच नाही. त्याला ती आंधळी मैत्री दिसत होती आणि समोरून ती मैत्री नव्हती, हे मला दिसत होतं. मी मैत्री करणारा माणूस असल्याने त्यांची मैत्री तोडू शकत नव्हतो. मी माझा स्वार्थ बघू शकत नव्हतो”, असे म्हणत धनंजयने वैभव चव्हाणबाबत मत व्यक्त केले आहे.
दरम्यान, बिग बॉसच्या घरात धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर यांची मैत्री चर्चेत राहिल्याचे पाहायला मिळाले. आता बिग बॉसच्या घराबाहेरदेखील ही मैत्री तशीच राहणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.