Bigg Boss Marathi 5 व्या पर्वाची विशेष बाब ही होती की, कलाकारांबरोबरच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरदेखील या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. या पर्वाचा विजेता ठरलेला सूरज चव्हाण, पाचव्या स्थानावरून घराबाहेर पडलेली अंकिता वालावलकर, तर चौथ्या स्थानापर्यंत मजल मारलेला धनंजय पोवार आणि आणखी इतर काही स्पर्धक हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत; जे या पर्वात सहभागी झाले होते. ज्या स्पर्धकांनी आपल्या खेळ अन् वागण्याने आणि आपल्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यापैकी धनंजय पोवार (Dhananjay Powar) एक आहे. आता धनंजयने एका मुलाखतीत वडिलांबरोबरचा अबोला बिग बॉसमुळे दूर झाला, असे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाला धनंजय पोवार?

धनंजय पोवारने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत वडील बिग बॉसच्या घरात आले होते, त्या क्षणाबद्दल बोलताना त्याने म्हटले, “माझ्या वडिलांनी गेल्या ३८ वर्षांत मला मिठी मारली नव्हती, डोळ्यात पाणी आणलं नव्हतं किंवा माझ्याही डोळ्यांत पाणी आलं नव्हतं. खरं सांगायचं, तर गेली ३२ वर्षे माझा वडिलांबरोबर अबोला होता. कामापुरतं, जेवलास काय वगैरे इतकंच बोलायचो.”

पुढे बोलताना धनंजयने म्हटले, “मी कमवायला सुरुवात केली होती. त्यावेळी आमच्यात खटके उडत होते. पैसे मिळविण्याच्या नादात माझ्या हातून बऱ्याच चुकादेखील झाल्या होत्या. त्यामुळे वडील माझ्यावर खूप नाराज झाले होते. त्यांची नाराजी आर्थिक नुकसानीसाठी नव्हती, तर त्यांचे न ऐकल्याबद्दलची होती. माझ्या मनात अपराधी भावना होती. मला असं वाटायचं की, माझे वडील मला नाकर्ता मुलगा समजतात आणि मला त्यांच्यापुढे ताठ मानेनं उभं राहायचं होतं. आजही माझे वडील दुकानाचा जो काही व्यापार होतो, त्याचे पैसे संध्याकाळी वडील माझ्याकडून मोजून घेतात, त्यामुळे तो एक दबाव माझ्यावर होता; पण बिग बॉसमुळे ते आता शक्य झालं आहे.” जेव्हा बिग बॉसच्या घरात धनंजयचे वडील घरात आले होते, त्यावेळी ते दोघेही भावूक झाल्याचे दिसले होते.

हेही वाचा: Bigg Boss Marathi: जान्हवी किल्लेकरला जाऊबाई म्हणाली, “मी घरात येऊन तुला मारलं असतं…”

दरम्यान, धनंजय पोवार आपल्या कॉमेडी व्हिडीओसाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. बिग बॉसमध्ये त्याचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला. आता यापुढे त्याची काय वाटचाल असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.