Bigg Boss Marathi Dhananjay Powar : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदा कोल्हापूरच्या रांगड्या गड्याने सहभाग घेतला होता. आई अन् पत्नी यांच्याबरोबर रील्स बनवून डीपी आधीच घराघरांत लोकप्रिय होता. मात्र, ‘बिग बॉस मराठी’मुळे त्याला भरभरून प्रसिद्धी मिळाली. पहिल्या दिवशी घरात सहभागी झाल्यावर पुढे जाऊन आपण टॉप-४ पर्यंत मजल मारू असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. मात्र, अचूक ग्रुप, मैत्री, गेमप्लॅन आणि स्वत:ची मतं ठामपणे मांडत धनंजयने स्वत:ला सिद्ध केलं. याशिवाय कोल्हापुरातून त्याला भरभरून प्रेम आणि चाहत्यांचा पाठिंबा मिळत होता. यामुळेच या सोशल मीडिया स्टारचा प्रवास ग्रँड फिनालेपर्यंत जाऊन पोहोचला.

‘बिग बॉस’च्या घराने धनंजयला ‘डीपी दादा’ ही नवीन ओळख मिळवून दिली. सोशल मीडिया स्टार असण्याबरोबरच तो एक व्यावसायिक सुद्धा आहे. आज कोल्हापुरात त्याचं भव्य स्वागत होणार यानिमित्ताने धनंजयबद्दल जाणून घेऊयात…

धनंजयचं होणार भव्य स्वागत

धनंजय पोवार ( dhananjay powar ) मूळचा कोल्हापूरचा आहे. सोशल मीडिया रील स्टार म्हणून ओळख असलेल्या डीपीचा इचलकरंजीत मोठा व्यवसाय आहे. करोना काळात पोवार कुटुंबीयांचे घरगुती व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाले होते. याशिवाय डीपी म्हणजेच धनंजय पोवारचं इचलकरंजीत ‘सोसायटी फर्निचर’ हे तीन मजली भव्य असं शोरुम आहे. ‘बिग बॉस’च्या आधी त्याने एक व्यावसायिक म्हणूनही मोठी लोकप्रियता आणि यश मिळवलं आहे. आज याच दुकानाबाहेर त्याच्या स्वागतासाठी भव्य तयारी करण्यात आली आहे.

धनंजय आज जवळपास अडीच महिन्यांनी आपल्या स्वगृही पतरणार आहे. यासाठी कोल्हापूरकरांनी जय्यत तयारी केली आहे. ‘सोसायटी फर्निचर’ या त्याच्या दुकानाबाहेर खास ‘कोल्हापुरी हलगी’ आणि संभळ वाजवून डीपीचं स्वागत करण्यात येत आहे. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. यापैकी दुकानाबाहेर हलगी वाजवतानाचा व्हिडीओ suryavanshiravi_daji या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

धनंजय पोवारच्या स्वागताची तयारी ( dhananjay powar )

हेही वाचा : Video : सूरज ‘बिग बॉस’ची ट्रॉफी घेऊन गावी पोहोचला, चाहत्यांची गर्दी अन् झालं असं काही…; नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ

धनंजय पोवारची ( dhananjay powar ) कोल्हापूरात आज ( ९ ऑक्टोबर ) संध्याकाळी ५ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शो संपल्यावर त्याने थेट कुटुंबीय व बहीण मानलेल्या अंकिताबरोबर विजयाचं सेलिब्रेशन केलं होतं. तसेच, मुंबईत मुलाखती व अन्य कामं असल्याने त्याला कोल्हापूरला लगेच निघता आलं नाही. त्यामुळेच आज जवळपास अडीच महिन्यांनी हा रांगडा गडी घरी परतत असल्याने त्याचे चाहते, मित्रमंडळी व कुटुंबीय आनंद व्यक्त करत आहे.