‘लाखात एक आमचा दादा'(Lakhat Ek Amacha Dada) मालिकेत सध्या धनूच्या लग्नाचा ट्रॅक पाहायला मिळत आहे. याबरोबरच, सूर्याची आई आशादेखील तुरुंगातून पॅऱोलवर बाहेर आली आहे. ती या लग्नात सहभागी झाली, मात्र तिने तिची ओळख उघड केली नाही. जालिंदर ऊर्फ डॅडी तिच्या शोधात असल्याचे पाहायला मिळाले. सूर्याची आई तो लहान असताना त्यांचं घर सोडून गेली. ती पळून गेली असे गावकऱ्यांकडून म्हटले जात होते, त्यामुळे सूर्याच्या घराला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आई घरातून गेल्यानंतर त्याच्या वडिलांना दारूचे व्यसन लागले. त्यानंतर घराची जबाबदारी सूर्याच्या अंगावर पडली. त्याने त्याच्या लहान चार बहिणींची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली. त्यांना मायेने, प्रेमाने वाढवले. त्यांची चांगल्या घरात लग्न करून देण्याची स्वप्ने पाहिली. तसेच त्याच्या वडिलांचीदेखील काळजी घेतली.
आई घरातून गेल्याने बहिणींची लग्न होण्यास अडचणी येत असल्याचे मालिकेत पाहायला मिळाले. आधी तेजूचे लग्न झाले, त्यानंतर आता धनूच्या लग्नाची सर्वांना घाई झाली होती. ज्या मुलाबरोबर धनूचे लग्न ठरले, त्याचे कुटुंब पैशासाठी हापापलेले होते. त्यानंतर हे लग्न मोडले, त्यानंतर धनूचे लग्न दत्तूबरोबर ठरले.
सूर्यादादावरील प्रेम व्यक्त करीत धनू म्हणाली…
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत धनूची भूमिका अभिनेत्री समृद्धी साळवीने साकारली आहे. समृद्धीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये धनू सूर्या दादाला मिठी मारून रडत असल्याचे दिसत आहे. सूर्या दादाही भावूक झाल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. हा फोटो धनूच्या पाठवणीचा असल्याचे दिसत आहे. समृद्धीने शेअर केलेला दुसरा फोटो सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या घिबली आर्टमध्ये दिसत आहे. या दोन्ही फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. हा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले, “मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे.”, ही ओळ ‘तुला जपणार आहे’ या गाण्यातील आहे. तसेच पुढे रडण्याची आणि हार्ट इमोजीदेखील शेअर केली आहे. हे फोटो शेअर करताना समृद्धीने नितीश चव्हाणला टॅग केले आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेले हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे. मालिकेतील या ऑनस्क्रीन भावंडांचा ऑफस्क्रीन बॉण्डदेखील चाहत्यांना आवडत असल्याचे दिसते. अनेकदा हे कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. कधी डान्स तर कॉमेडी रील्समधून हे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. बहिणी-भावंडांच्या या बॉण्डिंगबरोबरच मालिकेतील इतर पात्रेही प्रेक्षकांची लाडकी आहेत. डॅडी, शत्रू, काजू, पुड्या, तात्या ही सर्वच पात्रे प्रेक्षकांचे मने जिंकताना दिसतात. मालिकेत सूर्या दादाची भूमिका अभिनेता नितीश चव्हाणने साकारली आहे.
आता मालिकेत पुढे काय होणार, दत्तूने धनूबरोबर लग्न करण्यास का होकार दिला, हे सर्वांना कळणार का तसेच सूर्याच्या आईची म्हणजेच आशाची व तिच्या कुटुंबाची भेट कधी होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.