Ankita Walawalkar Wedding : ‘कोकण हार्टेड गर्ल’ नावाने लोकप्रिय असणारी कोकण कन्या अंकिता वालावलकर अखेर लग्नबंधनात अडकली. १६ फेब्रुवारीला अंकिताचा मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. संगीतकार कुणाल भगतशी लग्नगाठ बांधून अंकिताने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. सध्या अंकिता आणि कुणालच्या लग्नाच्या फोटो, व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
अंकिता वालावलकरच्या लग्नसोहळ्याला १३ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. मेहंदी, साखरपुडा, संगीत, हळद आणि सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा अंकिताचा पाहायला मिळाला. लग्नासाठी अंकिताने खास पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. तसंच अंकिताचा पती कुणालने मराठमोळा लूक केला होता. अत्यंत पारंपरिक पद्धतीने दोघांचा लग्नसोहळा पार पडला. लग्नातील एका व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता म्हणतेय, “मी नावं ठेवण्यासारखी नाहीच.” पण ती असं का म्हणते? जाणून घ्या…
लग्नानंतर नववधूचं नाव बदलण्याची परंपरा असते. या परंपरेनुसार अनेकजण पत्नीचं नाव बदलतात. हीच परंपरा अंकिताच्या लग्नात पाहायला मिळाली. फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर सर्वेश पेडणेकरच्या इन्स्टाग्रामवर अंकिताच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये सर्वजण अंकिताला विचारतात नाव काय ठेवलं? तर अंकिता म्हणते, “मी नावं ठेवण्यासारखी नाहीच आहे. त्यामुळे माझं नाव अंकिताच आहे. म्हणून अंकिताच नाव ठेवलं आहे.” त्यानंतर लग्नातील खास क्षण पाहायला मिळत आहे.
दरम्यान, अंकिता वालावलकर आणि कुणाल भगतच्या लग्नाला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील बरीच मंडळी पाहायला मिळाली. धनंजय पोवार, पंढरीनाथ कांबळे, पुरुषोत्तम दादा पाटील, निखिल दामले यांनी अंकिताच्या लग्नाला खास हजेरी लावली होती. याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
अंकिताचा पती कुणाल भगत लोकप्रिय संगीतकार आहे. बऱ्याच चित्रपटातील गाणी आणि मालिकांचं शीर्षकगीत त्यानं संगीतबद्ध केलं आहे. तसंच आगामी ‘झापुक झुपूक’ चित्रपटासाठीदेखील कुणाल काम करणार आहे.