‘बिग बॉस १८'(Bigg Boss 18) हा सध्या चर्चेत असलेला शो आहे. घरातील स्पर्धकांची भांडणे, आरोप-प्रत्यारोप, बिग बॉसने दिलेले टास्क यांमुळे हा शो सतत चर्चेत असल्याचे दिसते. आता या आठवड्यात बिग बॉसने दिलेल्या टास्कनुसार घरातील स्पर्धकांनी शोमधून बाहेर पडण्यासाठी एका स्पर्धकाची निवड केली. त्यानुसार दिग्विजय सिंह राठी(Digvijay Rathee) ‘बिग बॉस १८’मधून बाहेर पडणार असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस १८’चा एक प्रोमो सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
दिग्विजय सिंह राठी झाला भावुक
कलर्स टीव्हीने ‘बिग बॉस १८’चा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा प्रोमो वीकेंड का वार या एपिसोडचा आहे. सलमान खान व दिग्विजय राठी एकाच मंचावर पाहायला मिळत आहेत. सलमान खान दिग्विजयला म्हणतो, “तू इतक्या लवकर शोबाहेर होशील, याचा कोणीही विचार केला नव्हता. अजूनही तुझे डोळे भरून आले आहेत. तू चुकीच्या लोकांबरोबर नाते तयार केलेस, असे तुला वाटते?”, असे विचारल्यावर दिग्विजयने म्हटले, “लोक खूप लवकर बदलतात, असे मला वाटते.” त्यानंतर सलमान त्याला म्हणतो, “तू शोमधून बाहेर पडण्यासाठी कोण कोण जबाबदार आहे?” त्यावर दिग्विजयने म्हटले, “करण व चूम हे असतील, असे मला वाटते. मला माहीत होते की, जर माझ्यासाठी उभे राहण्याची वेळ आली, तर कोणी नसेल.” त्याच्या या बोलण्यावर करण ‘सॉरी’ म्हणत माफी मागताना दिसत आहे. करणने माफी मागताच सलमान त्याला “आता त्याचा काय उपयोग आहे”, असे म्हणताना दिसत आहे.
हा प्रोमोवर प्रेक्षक सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत. अनेकांनी आम्हाला दिग्विजय घरात पाहिजे, असे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “दिग्विजय परत आला पाहिजे.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले, “तो टॉप ५ मध्ये असायला हवा.” आणखी एका नेटकऱ्याने, “दिग्विजयला परत आणा”, असे म्हटले आहे.
दरम्यान, बिग बॉसच्या १८ व्या पर्वात दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूर यांची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. सहभागी झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच या दोन स्पर्धकांनी इतर स्पर्धकांच्या नाकीनऊ आणल्याचे पाहायला मिळत होते. दिग्विजय राठोड आणि कशिश कपूर हे याआधी ‘स्प्लिट्सविला १५’मध्ये सहभागी झाले होते. आता प्रेक्षकांच्या मागणीमुळे दिग्विजयची शोमध्ये पुन्हा एकदा एन्ट्री होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.