आपल्या विनोदाने कित्येकांना हसवून त्यांचं आयुष्य समृद्ध करणारा कॉमेडीयन व अभिनेता कपिल शर्मा हा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. कपिलला एका उद्योगपतीने करोडो रुपयांना गंडा घातला आहे. सध्या कपिल याच प्रकरणासंदर्भात ‘ईडी’च्या चौकशीला सामोरा जात आहे. प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरिया यांच्यावर कपिलने फसवणुकीचा आरोप केला आहे. कपिलने दिलीप यांना कस्टमाइज्ड वॅनीटी वॅन बनवून देण्याची ऑर्डर दिली होती, पण त्यांनी अद्याप ती वॅन डिलिव्हर केली नसल्याने कपिलने कायदेशीर कारवाई केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतकंच नव्हे तर दिलीप छाबरिया यांनी कपिलकडून पैसे लुबाडण्याचाही प्रयत्न केला असल्याचं स्पष्ट झालं आहे. दिलीप छाबरिया व त्यांची कंपनी ‘डिसी’ ही कस्टमाइज्ड गाड्या बनवण्यासाठी ओळखली जाते. बऱ्याच सेलिब्रिटीजसाठी त्यांनी आजवर गाड्या तयार केल्या आहेत, शिवाय भारतातील पहिली स्पोर्ट्स कारदेखील त्यांनीच बनवली होती. परंतु आता ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कपिलसह इतरही काही सेलिब्रिटीजनी दिलीप यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. ‘ईडी’ने या मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी दिलीप छाबरिया यांच्यासह इतर सहा आरोपींना समन्स धाडले आहेत. त्यांना २६ फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

आणखी वाचा : “१५ महीने माझ्याकडे काम नव्हते”, क्रीती सेनॉनने सांगितली स्ट्रगलच्या काळातील आठवण

कपिल शर्माचे प्रतिनिधि मोहम्मद हमीदने ‘ईडी’ला दिलेल्या माहितीनुसार २०१६ मध्ये कपिलने दिलीप यांना वॅनीटी वॅन बनवण्यासाठी संपर्क केला होता. २०१७ मध्ये दिलीप यांची कंपनी व कपिलची कंपनी यांच्यात ४.५ कोटींचा एक करार झाला. कपिलच्या कंपनीने कारारातील अटींनुसार दिलीप यांच्या कंपनीला टॅक्ससकट ५.३१ कोटींची रक्कम दिली, परंतु कपिलला आजतागयात वॅनीटी वॅनची डिलिव्हरी मिळाली नाही, ना त्याचे पैसे पुन्हा मिळाले. मीडिया रीपोर्टनुसार दिलीप यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या बऱ्याच केसेस झाल्या अन् याचदरम्यान पुण्याच्या त्यांच्या ६ वर्कशॉपवर ‘ईडी’ची धाड पडली.

जेव्हा कपिलने वॅनीटी वॅनबद्दल दिलीप यांच्याकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी वरवरची उत्तरं देत त्याला थोपवलं. नंतर पैशांची चणचण असल्याचं कारण देऊन दिलीप यांनी कपिलकडे आणखी काही पैशांची मागणी केली. तेव्हा कपिल शर्मा त्यांच्यावर भडकला अन् त्यानंतर दोघांचे संबंध बिघडायला सुरुवात झाली. दिलीप यांनी मेल करून वॅनची डिलिव्हरी न होण्यामागे कपिलच जबाबदार आहे हे पटवायचा पूर्ण प्रयत्न केला. कपिलला कळून चुकलं होतं की दिलीप हे धडधडीत फसवणूक करत आहेत अन् त्याने या प्रकरणात कठोर पावलं उचलायचा निर्णय घेतला व दिलीप यांना नोटिस पाठवली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilip chhabria tried to illegaly extract money from kapil sharma comedian takes legal action avn